राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक; प्रवीण तरडेंसोबत मारल्या दोन तास गप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 01:06 PM2022-06-02T13:06:27+5:302022-06-02T13:10:22+5:30
रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.
मुंबई: आताच्या घडीला चित्रपटसृष्टीत मराठी चित्रपटांचा बोलबाला सुरू असल्याचे दिसत आहे. धर्मवीर असो, चंद्रमुखी असो किंवा सरसेनापती हंबीरराव असो, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मराठी चित्रपटांना मिळत असल्याचे दिसत आहे. हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेकांनी यातील चित्रपटांचे कौतुक केले आहे. या चित्रपटांची चर्चाही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक, लेख प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. यातच आता राज ठाकरे यांनी सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले असून, माझ्याशी दोन तास छान गप्पा मारल्याचे खुद्द प्रवीण तरडे यांनी सांगितले.
प्रवीण तरडेंनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेंविषयी सांगितले आहे. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
आम्ही दीड-दोन तास गप्पा मारत होतो
राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, आम्ही दीड-दोन तास गप्पा मारत होतो आणि राजसाहेब ठाकरे फक्त चित्रपटांविषयी बोलत होते. मराठी चित्रपट त्याची पुढची वाटचाल, टेक्नॉलॉजी, व्हिएफेक्स, भाषेचे अडथळे, सबटायटल्स यात मराठी चित्रपट कसा टिकणार, याविषयी सविस्तर चर्चा केली. राज साहेब पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रपटांनी कसे स्वत: चे स्थान मिळवले पाहिजे. कारण रोज ते एक चित्रपट पाहून झोपतात, असा किस्सा प्रवीण तरडे यांनी सांगितला.
महाराष्ट्राला ही एक परंपरा आहे
महाराष्ट्राला ही एक परंपरा आहे. मग शरद पवार साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, स्वत: बाळासाहेब ठाकरे हे चित्रपटाचे भक्त होते म्हणून कलाकारांवर त्यांचे प्रेम होते. त्यामुळे राज साहेबांच्या बोलण्यात चित्रपटाचे कॅमेरा अँगल, लेनसेल अॅक्सेस यावर बोलत होते. यावेळी हंबीररावबद्दल त्याच्या भव्यतेबद्दल चर्चा झाली कारण त्यांनी टिझर आणि ट्रेलरवर चर्चा झाली आणि त्यांनी कौतुक केले म्हणाले मराठी चित्रपट जर या दर्जाला येत असेल तर याचे भविष्य आणि वाटचाल खूप चांगली आहे, असे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.