चौकातल्या पोराला फिल्मफेअर! मित्रासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "मलाही मिळाला नाही तो अवॉर्ड..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 01:00 PM2024-04-19T13:00:30+5:302024-04-19T13:00:53+5:30
"आज दयाचे वडील हवे होते", मित्राला पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण तरडेंची पोस्ट
फिल्मफेअर पुरस्काराला मनोरंजनविश्वात मानाचं स्थान आहे. यंदाचा फिल्मफेअर मराठी सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मराठी कलाकारांचा जलवा रेड कार्पेटवर पाहायला मिळाला. यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात अनेक मराठी सिनेमांना पुरस्कार मिळाले. चौक सिनेमासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांना पुरस्कार मिळाला.
देवेंद्र गायकवाड यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण तरडेंनी मित्रासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. फिल्मफेअरच्या ट्रॉफीबरोबरचा त्यांचा फोटो शेअर करत प्रविण तरडेंनी भावुक पोस्ट शेअर केली आहे. "चौकातल्या पोराला फिल्मफेअर... आज दयाचे वडील हवे होते. लहान मुला सारखे नाचले असते. पुरुषोत्तम करंडकच्या बक्षिस समारंभापासून प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक करायला यायचे. मला गमतीने म्हणायचे, ये तरडे अरे हा नुसतं तुझ्याबरोबर फिरणार का तुझ्यासारखी बक्षिसं पण घेणार? बघितलं का काका जे अजून मलाही नाही मिळालं ते बक्षिस आज तुमच्या मुलानी घेऊन दाखवलं...दया तुझा अभिमान आहे आम्हाला", असं प्रविण तरडेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
देवेंद्र गायकवाड यांनी 'चौक' सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. हा सिनेमा २ जून २०२३ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात संस्कृती बालगुडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, प्रविण तरडे, स्नेहल तरडे अशी स्टारकास्ट आहे.