राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 03:23 PM2024-06-17T15:23:04+5:302024-06-17T15:29:37+5:30
मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे अभिनयाबरोबरच त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या चित्रपटातून प्रवीण तरडेंनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाचीही छाप पाडली. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या सिनेमातील त्यांचा पहिला लूक समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रविण तरडेंनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री घेत असल्याची हिंट दिली होती. पण, या सिनेमाचं नाव त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं. आता अखेर या सिनेमाबाबत त्यांनी मोठी अपडेट दिली आहे. 'अहो विक्रमार्का' असं या दाक्षिणात्य सिनेमाचं नाव आहे. मराठी सिनेसृष्टी गाजवलेले प्रविण तरडे या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील त्यांच्या लूकचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये त्यांचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.
"दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत 'मुख्य खलनायक ' म्हणून माझा प्रवेश .. अहो विक्रमार्का मधे “ असुरा “ बनून येतोय तुमच्या भेटीला…मराठी बरोबर भारतातल्या सहा भाषांमधे...🚩🚩अख्ख्या भारतभर मार्केट आता आपलं आहे🚩🚩", असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांना साऊथ सिनेमामध्ये पाहण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. त्यांच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी प्रविण तरडेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
एस. एस. राजामौली फिल्म्सचे सहाय्यक दिग्दर्शख त्रिकोटी पेटा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर डॉ. मिहीर कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे. तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगालीसह मराठी अशा एकूण ७ भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. लवकरच 'अहो विक्रमार्का' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.