प्रविण तरडेंच्याही घरी आले राम! पत्नीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाल्या - तुम्ही १४ वर्ष वनवास भोगला, पण कलियुगात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 06:20 PM2024-01-22T18:20:29+5:302024-01-22T18:21:07+5:30
प्रविण तरडेंच्या घरी "राम आए है"! व्हिडिओ शेअर करत म्हणाले - कलियुगातील या रामराज्यात...
सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. अयोध्यानगरीत आज रामलला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. एकीकडे अयोध्येत रामलला विराजमान होत असताना दुसरीकडे मराठी दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या घरीही प्रभू श्रीरामाचं आगमन झालं.
प्रविण तरडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेंना याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मोठ्या जल्लोषात तरडे फॅमिलीने घरी प्रभू श्रीरामाचं आगमन केलं. श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मुर्ती वाजतगाजत घरी आणत त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. प्रभू रामाच्या आगमनासाठी रांगोळीचा सडा घालण्यात आला होता. राम मंदिराची प्रतिकृती आणि फळांची आरासही करण्यात आली होती. हा व्हिडिओ शेअर करत स्नेहल तरडेंनी खास पोस्ट लिहिली आहे.
सीतापती प्रभू श्रीरामचंद्र यांस साष्टांग दंडवत 🙏🏼
प्रभू, त्रेतायुगात तुम्ही १४ वर्षे वनवास भोगला आणि या घोर कलियुगाने मात्र तुम्हाला तब्बल ४९६ वर्षांसाठी वनवासात धाडले. यासाठी काळ तुमचा क्षमाप्रार्थी आहे. परंतु ज्याप्रमाणे त्रेतायुगीन वनवासात तुम्हाला अनेक भक्तांनी यथाशक्ती सर्वतोपरी मदत केली, प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्याचप्रमाणे कलियुगातही अनेक वीर भक्तांनी रामकार्यासाठी जीवन समर्पित केले.नि:शस्त्र भक्तांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्यावेळी प्राणांची आहुती दिलेल्या भक्तांच्या रक्ताने शरयू नदीचे पाणीदेखील लाल झाले. कलियुगातील रामायणाचा हा रक्तरंजित अध्याय संपवून, राक्षसी वृत्तींचा पराभव करुन अखेरीस तुम्ही स्वगृही अयोध्येस परतत आहात...प्रभू तुमचे स्वागत असो!
आज आम्हा समस्त सनातन हिंदू धर्मियांना, तुमच्या भक्तांना अपार आनंद होतो आहे. तुम्ही अयोध्येस परत आलात म्हणजे आता या भारतवर्षात रामराज्य पुन्हा सुरु झाले आहे असेच आम्ही सर्वजण मानतो. कलियुगातील या रामराज्यात भारत देश धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक या सर्व स्तरांवर प्रगतीशील होवो, येथे समृद्धी नांदो हीच तुमच्या चरणी प्रार्थना 🙏🏼
सीतापती श्रीरामचंद्र की जय !
सनातन हिंदू धर्म की जय!
यतो धर्मस्ततो जयः
स्नेहल तरडेंनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. तरडे फॅमिलीचं कौतुक नेटकरी करत आहेत.