प्रविण तरडेचं 100 टक्के ठरलं...! मनसेच्या दहिहंडीत नाचणार म्हणजे नाचणार...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:02 PM2021-07-22T14:02:04+5:302021-07-22T14:02:50+5:30
विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार... या मनसेच्या घोषणेनंतर मराठी अभिनेता प्रविण तरडे यानेही एक घोषणा केलीये.
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरातून बाहेर पडायची सोय नाही, अशात सण आणि उत्सव कुठे साजरे करणार? अशीच एकंदर परिस्थिती. गेल्या दीड वर्षांत अनेक सण व उत्सव लोकांनी घरात बसूनच साजरे केले. दहिहंडीचा महाराष्ट्राच्या जल्लोषात साज-या होणा-या उत्सवावरही कोरोनाने पाणी फेरले. पण यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मांड ठोकलीये आणि यंदा 31 ऑगस्टला विश्वविक्रमी दहिहंडी (Dahi Handi 2021) साजरी करण्याची घोषणा केलीये. विशेष म्हणजे, मनसेच्या या घोषणेनंतर मराठी अभिनेता प्रविण तरडे (Pravin Tarde) यानेही एक घोषणा केलीये. होय, मी नाचायला येणार, असे त्याने जाहिर केलेय.
मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुकवा दहिहंडीबाबत ही मोठी घोषणा केली. ‘विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जाहिर केले. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असे आवाहन अभिजित पानसे यांनी केले. त्यांच्या या पोस्टवर प्रविण तरडेने ‘100 टक्के नाचायला येणार’ अशी कमेंट केली आहे. त्याची ही कमेंट पाहताच चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे, हे नव्याने सांगणे नकोच.
ठाणे जिल्हा दहिहंडीसाठी लोकप्रिय आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक असा विविध जिल्ह्यांतून दहिहंडी पथकं ठाण्यात दाखल होत असतात. पण कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे गेल्या वर्षी दहिहंडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पाहायला मिळाला होता. पण आता मनसेच्या भूमिकेने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार आणि पोलीस याबाबत काय भूमिका घेतात हे पाहण महत्वाचे असणार आहे.