'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 08:00 AM2019-03-13T08:00:00+5:302019-03-13T08:00:00+5:30

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

Pravin tarde will play arbiter role in sur sapata | 'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

'सूर सपाटा'मध्ये प्रवीण तरडे साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्दे'सूर सपाटा' मध्ये कबड्डी 'पंच'ची भूमिका प्रवीण तरडे निभावताना दिसणारेत.

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. संवेनशील लेखक, दर्जेदार अभिनेते, उत्तम निर्मितीमूल्य जपणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले प्रवीण तरडे एकेकाळी कबड्डी व सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू सुद्धा होते. ही ओळख काहीशी प्रेक्षकांसाठी नवीन असली तरी त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहता येणार आहे ते म्हणजे 'सूर सपाटा' या आगामी मराठी चित्रपटात. 'सूर सपाटा' मध्ये कबड्डी सामन्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या 'पंच'ची भूमिका प्रवीण तरडे निभावताना दिसणारेत. लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. ली. प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' होलिकोत्सवाचे औचित्य साधत २१ मार्चला रसिक-प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'कुंकू' या लोकप्रिय मालिकेचे लेखक प्रवीण तरडेंचा करिअरग्राफ सातत्याने पण संयतपणे चढतच राहिला. 'पिंजरा', 'कन्यादान', 'तुझं माझं जमेना' यांसारख्या मालिकांचे लेखन असेल अथवा 'कुटुंब', 'पितृऋण', 'रेगे', 'मुळशी पॅटर्न' यांसारख्या संवेदनशील चित्रपटांचे काथा-पटकथाकार-संवादलेखक शिवाय 'देऊळ बंद' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनक्षेत्रातही उडी घेणारे प्रवीण तरडे मनोरंजनक्षेत्राच्या मैदानात एकामागोमाग-एक यशस्वी सूर मारताना दिसतात. 'सूर सपाटा'निमित्ताने त्यांना आपल्या कॉलेजविश्वातले उमेदीचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. चित्रपटाचा विषयच 'कबड्डी' असल्यामुळे हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास असल्याचं ते म्हणतात. कबड्डीचे रंगतदार सामने, स्पर्धकांची जिंकण्यासाठी चाललेली चढाओढ, दोन्ही बाजूच्या स्पर्धक कंपूतील इरिशिरी पाहताना प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहचणार हे नक्की.

ईगल आय एंटरटेन्मेन्टचे प्रकाश नाथन, हिमांशू अशर, संजय पतौडीया, अर्शद खान प्रस्तुत किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'ची कथा मंगेश कंठाळे यांनी हिली असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबावडे आदींसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे आणि नेहा शितोळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा असून अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.
 

Web Title: Pravin tarde will play arbiter role in sur sapata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.