प्रवीण तरडेंचा हा चित्रपट बड्या मराठी चॅनेल्स आणि निर्मात्यांनी नाकारला होता, खुद्द त्यांनीच केला खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 03:01 PM2023-04-01T15:01:32+5:302023-04-01T15:01:48+5:30

Pravin Tarde : प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या समस्या प्रकाशझोतात आणल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Pravin Tarde's film was rejected by big Marathi channels and producers, he himself revealed, said... | प्रवीण तरडेंचा हा चित्रपट बड्या मराठी चॅनेल्स आणि निर्मात्यांनी नाकारला होता, खुद्द त्यांनीच केला खुलासा, म्हणाले...

प्रवीण तरडेंचा हा चित्रपट बड्या मराठी चॅनेल्स आणि निर्मात्यांनी नाकारला होता, खुद्द त्यांनीच केला खुलासा, म्हणाले...

googlenewsNext

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीरसारखे चित्रपट देणारे निर्माते-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ (Mulashi Pattern) या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या समस्या प्रकाशझोतात आणल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. परंतु हाच मुळशी पॅटर्न सगळ्या बड्या मराठी चॅनल्स, निर्माते आणि वितरकांनी विकत घेण्यास नकार दिला होता. हा खुलासा खुद्द प्रवीण तरडेंनी केला आहे.

प्रवीण तरडे यांनी पिंपरी चिंचवड येथे ‘दिशा सोशल फाउंडेशन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न बऱ्याच मराठी लोकांनी नाकारल्याचा मोठा खुलासा केला. तसेच बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने तो चित्रपट विकत घेऊन चालवण्यात प्रवीण तरडे यांची मदत केली होती.
प्रवीण तरडे म्हणाले, आम्ही मुळशी पॅटर्न घेऊन एका मोठ्या चॅनेलकडे गेलो जे चित्रपट घेतात. त्यांना आम्ही मुळशी पॅटर्न दाखवला, पण त्यांना काही केल्या तो चित्रपट पटला नाही. ती शहरी माणसे होती, त्यांनी मुळात कधी गाव किंवा शेतकऱ्याचे आयुष्य पाहिलेच नसावे त्यामुळे आणि चित्रपटातील भाषा ही थोडी रांगडी असल्याचे कारण देऊन त्यांनी हा चित्रपट घेण्यास नकार दिला. यामुळे माझे निर्माते चिंतेत पडले, कारण त्यांनी त्यांच्या वडिलांशी भांडून माझ्या या चित्रपटावर पैसे लावले होते.


ते पुढे म्हणाले की, नंतर आमच्या टीममधील लोकांनी ठरवलं की हा चित्रपट आता त्यांना दाखवायचा ज्यांना ही भाषा समजते. त्यामुळे आम्ही आजवर ज्यांनी ‘बाहुबली’, ‘दंगल’, ‘३ इडियट्स’सारखे चित्रपट चालवले असे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांच्याकडे हा ‘मुळशी पॅटर्न’ घेऊन गेलो. ते आम्हाला म्हणाले की मी सर्वप्रथम चित्रपट बघतो आणि मग तुमच्याशी बोलतो. त्यावेळी त्यांनी तो चित्रपट मराठीतच सबटायटल्स नसताना पाहिला. त्यांनी हा चित्रपट विकत घेतला.
हा चित्रपट बंपर हीट ठरणार हे अनिल थडानी आम्हाला म्हणाले. यावर आम्ही त्यांना सांगितले की मराठीतले निर्माते तर हा चित्रपट चालणार नाही असं म्हणतात, त्यावर ते म्हणाले की मग त्यांना चित्रपट काय असतो ते समजत नसेल! यानंतर त्यांनी तो चित्रपट चालवला, मुळशी पॅटर्न प्रदर्शित झाला आणि नंतर सलग २ दिवस तिकीट मिळत नव्हते. तब्बल ११ आठवडे ‘मुळशी पॅटर्न’ मराठी लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर त्याच बड्याबड्या मराठी चॅनेल्स आणि निर्माते, वितरक यांचे आम्हाला सतत फोन्स येत होते, पण आम्ही त्यांच्या फोनला उत्तरच दिले नाही, कारण आम्हाला दिलेला त्रास इतक्या सहज आम्ही विसरणारे नव्हतो.

प्रवीण तरडे यांना त्यांच्या ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी नुकताच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर आता ते ‘मुळशी पॅटर्न २’ आणि ‘धर्मवीर २’ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. 

Web Title: Pravin Tarde's film was rejected by big Marathi channels and producers, he himself revealed, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.