कलाकारांच्या उपस्थितीत 'यंटम' चित्रपटाचा म्युझिक लाँच दिमाखात संपन्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 04:44 AM2018-01-15T04:44:55+5:302018-01-15T10:14:55+5:30
नावापासूनच आपलं वेगळेपण जपलेल्या 'यंटम' या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे.निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे ...
न वापासूनच आपलं वेगळेपण जपलेल्या 'यंटम' या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे.निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांच्या शार्दूल फिल्म्स अँड एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत,समीर आशा पाटील दिग्दर्शित 'यंटम' या चित्रपटासाठी चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटाच्या संगीतामध्ये काही खास प्रयोग केले आहेत.आपल्या अनोख्या आवाजानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या यंदाच्या 'सारेगमप' फायनलिस्ट योगेश रणमाळे या नव्या दमाच्या गायकानं या चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं आहे.'यंटम' चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.आजवर आपल्या प्रत्येक चित्रपटातून महाराष्ट्राची दाद मिळवलेले निर्माता दिग्दर्शक रवी जाधव चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.गीतकार मंगेश कांगणे यांनी गीतलेखन केलं असून या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत.त्यात 'ठाव लागना. ..' हे गाणं हर्षवर्धन वावरेनं,'गरा गरा 'हे ड्युएट गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी,'आनंद झाला फार....' हे गाणं छगन चौगुले यांनी आणि 'यंटम झाला....' हे टायटल साँग योगेश रणमाळेनं गायलं आहे.समीरसह मेहुल अघजा यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे.यंदाच्या सारेगमपच्या पर्वावेळी परीक्षक म्हणून काम करताना रवी जाधव यांनी योगेशचा आवाज ऐकला होता.त्यामुळे 'यंटम'च्या टायटल साँगसाठी गायकाच्या शोधात असलेल्या संगीतकार चिनार-महेश यांना रवी जाधव यांनी योगेशचं नाव सुचवलं.चिनार-महेश यांनी योगेशच्या आवाजावर खुश होऊन गाण्यासाठी निवड केली.ग्रामीण भागातून आलेल्या योगेशनं या गाण्याआधी रेकॉर्डिंग स्टुडिओही पाहिला नव्हता.त्यामुळे चिनार-महेश यांनी योगेशला गाण्याच्या तंत्रापासून सारं काही शिकवत त्याच्याकडून गाणं गाऊन घेतलं.योगेशनंही हे धडे मनापासून गिरवत उत्तम पद्धतीनं हे गाणं निभावलं असे दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितले.चित्रपटाचं संगीत करताना त्याच्या कथेचा,त्यातल्या वातावरणाचा,भाषेचा विचार करावा लागतो.'यंटम'चं कथानक नक्कीच वेगळं आणि मनोरंजक आहे.या चित्रपटाच्या संगीतात प्रयोग करण्याची आम्हाला संधी होती.चित्रपटाचं कथानक ग्रामीण पार्श्वभूमीवरचं असलं तरी त्यातली भावना युनिर्व्हसल आहे.त्यामुळे गाणी ग्रामीण भाषेत आणि संगीत आजच्या मॉडर्न पद्धतीचा असा प्रयोग आम्ही केला आहे.प्रेमगीत,गोंधळ अशी वैविध्यपूर्ण गाणी यात आहेत.आजच्या तरूणांना आवडेल असा गाण्यांचा साऊंड आहे.तसंच सनईचे दोन वेगळे ट्रॅक्सही यात ऐकायला मिळतील.चित्रपटाचं सगळं संगीत लाईव्ह पद्धतीनं रेकॉर्ड केलं आहे.त्यामुळे ओरिजिनल साऊंड हे याचं वैशिष्ट्य आहे,विंड्स ऑफ चेंज आणि साँग ऑफ लाईफ या म्युझिकल ट्रॅक्ससाठी ओंकार धुमाळने सनई वादन केलं असल्याचे संगीतकार चिनार-महेश यांनी माहिती दिली.अभिनेते सयाजी शिंदे,वैभव कदम,अपूर्वा शेळगावकर,ऐश्वर्या पाटील,अक्षय थोरात आणि ऋषिकेश झगडे यांचा अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.तर असा हा म्युझिकल जर्नीची अनोखी ट्रीट देणारा 'यंटम' २ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.