२०० स्क्रीन आणि ६०० शोज! पहिल्या सिनेमासाठी पृथ्वीकची पोस्ट, म्हणतो- आयुष्याचा सिनेमा नशीबाच्या बॅाक्स ॲाफिसवर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 01:34 PM2024-02-09T13:34:18+5:302024-02-09T13:34:47+5:30
"रुपेरी पडद्यावर इतरांना पाहत मोठा झालो आणि आज...", 'डिलिव्हरी बॉय' सिनेमासाठी पृथ्विकची पोस्ट
अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनेता पृथ्विक प्रतापने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेतून पृथ्विकने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. उत्तम अभिनय आणि विनोदाचे चौकार मारत तो प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. आता पृथ्विक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता त्याची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे.
पृथ्विकने 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं आहे. शुक्रवारी(९ फेब्रुवारी) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमासाठी पृथ्विकने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपलं आयुष्य एक कथा आहे… त्याला सुरुवात आहे, मध्य आहे आणि त्याला शेवट सुद्धा आहे. फक्त स्वतःवर आणि पटकथेवर विश्वास ठेवून मेहनत केली की आयुष्याचा सिनेमा नशीबाच्या बॅाक्स ॲाफिसवर चालतो म्हणजे चालतोच.
आज माझ्या आयुष्याची पटकथा महत्त्वाचं वळण घेतेय...रुपेरी पडद्यावर इतरांना पाहत मोठा झालो आणि आज मी स्वतः त्या रुपेरी पडद्याचा भाग झालोय. आमचा सिनेमा ‘डिलीवरी बॅाय’ आज संपूर्ण महाराष्ट्रात रीलीज होतोय.
हा सिनेमा तुम्ही थिएटर ला जाऊन पाहा… त्याच्यावर भरभरून प्रेम करा… २०० स्क्रीन आणि ६०० शो ज तुमची वाट पाहतायत…
तुम्ही प्रेक्षक माझ्या या सुद्धा कलाकृतीवर भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे कारण एक गोष्ट मला कळलीये…प्रयत्न प्रामाणिक असतील आणि त्याला मेहनतीची जोड असेल तर… आपल्या आयुष्याच्या सिनेमाला Happy Ending च असणार. आजपासून तुम्ही आमच्या ‘Delivery Boy’ बाळाचे मायबाप!
पृथ्विकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. 'डिलिव्हरी बॉय' सिनेमात पृथ्विकबरोबर अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री अंकिता लांडेपाटील मुख्य भूमिकेत आहेत. मोहसीन खान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.