उमेश कामतने सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा! "रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन्..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:43 PM2024-10-27T12:43:59+5:302024-10-27T12:44:28+5:30
"रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन् थेट वृत्तपत्रात छापून आला फोटो", उमेश -प्रियाच्या लव्हस्टोरीचा हटके किस्सा
मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ( Priya Bapat And Umesh Kamat ) हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. 2011 साली दसऱ्याच्या दिवशी उमेश कामत व प्रिया बापट लग्नबेडीत अडकले. त्याआधी बरीच वर्षे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात दोघांनी आपलं नात लपवून ठेवलं होतं. आता नुकतंच उमेशने एका पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या लव्हस्टोरीचा २५ वर्षांपूर्वी घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला.
प्रिया आणि उमेश यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'झी मराठी पुरस्कार' सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी उमेशने प्रियासोबतचा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "आम्ही एकदा वांद्रे रेक्लेमेशनला बसलो होतो. सर्वांना ती जागा माहितीच असेल. आतापर्यंत आम्ही दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये आमच्या लव्हस्टोरीचे असंख्य किस्से सांगितले आहेत, सर्वांना माहितेय. पण, हा किस्सा नवीन आहे". यावर प्रिया म्हणाली की, "सगळंच खरं नसतं सांगायचं". उमेश म्हणाला, "२५ वर्षांनंतर पहिल्यांदाच हा किस्सा बाहेर येणार आहे. रेक्लेमेशनच्या कट्ट्यावर आम्ही बाईक लावून बसलो होतो. त्यावेळी ते रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस होते. आम्ही आदल्या दिवशी तिथे बसलेलो आणि अचानक दुसऱ्या दिवशी मला प्रियाचा फोन आला, ती प्रचंड घाबरलेली होती".
पुढे तो म्हणाला, "अरे उमेश एका वृत्तपत्रात रेक्लेमेशनच्या कट्ट्याचा फोटो छापून आलाय. असा त्यांनी मुद्दाम आमचा म्हणून फोटो काढला नव्हता. पावसाळा होता, त्यामुळे त्या परिसरातला फोटो छापून आलेला. तेव्हा सुद्धा सगळे कपल्स तिथे बसलेले असायचे. नशीब त्यावेळी झूम वगैरे करायची पद्धत नव्हती. वृत्तपत्रात अशी झूम वगैरे करून पाहायची सोय नसते हे खरंच खूप चांगलं झालं. दोन दिवस आम्ही एकमेकांची समजूत काढली होती. बहुतेक आपलं भांडं आता फुटणार आणि आता सर्वांना कळणार".
प्रिया म्हणाली, "एकाने तो फोटो काढला आणि तो फोटो दुसऱ्या दिवशी मुंबई वृत्तांतच्या पहिल्या पानावर छापून आला होता. आपण दिसत नाहीये. आपण ते नाही आहोत, हे आम्ही दोघं एकमेकांना समजवत होतो. एवढ्यात माझ्या मैत्रिणीच्या मावशीने सुद्धा तिला विचारलं. ही प्रिया आहे का? हे मला माझ्या मैत्रिणीने फोन करून सांगितलं. मग, मी माझ्या घरी मुंबई वृत्तांतमधलं ते पानच कापून टाकलं होतं". प्रिया आणि उमेशचा हा किस्सा ऐकून एकच हशा पिकला. तर या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.