'..आता मला काहीही फरक पडत नाही', 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील बोल्ड सीनमुळे प्रिया बापट झाली होती ट्रोल
By तेजल गावडे | Published: July 30, 2021 07:50 PM2021-07-30T19:50:16+5:302021-07-30T19:50:47+5:30
अभिनेत्री प्रिया बापट हिची वेबसीरिज 'सिटी ऑफ ड्रिम्स'चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये तिने पूर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिची वेबसीरिज 'सिटी ऑफ ड्रिम्स'चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये तिने पूर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे. पहिल्या सीझनमध्ये ती गृहिणी असते आणि मग ती राजकारणात एन्ट्री करायचे ठरवते असे दाखवले होते. दुसऱ्या सीझनमध्ये पूर्णिमा गायकवाड मुख्यमंत्री पदाच्या सत्तेसाठी स्वतःच्या वडिलांविरोधात लढताना दिसणार आहे. पहिल्या सीझनमध्ये प्रिया बापटने बोल्ड सीन्स दिले होते. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याबद्दल प्रिया बापट म्हणाली की, ते सीन त्या गोष्टीचा भाग आहे. जर त्या स्क्रिप्टची आणि भूमिकेची गरज असेल तर मी असे सीन करेन.
अभिनेत्री प्रिया बापट बोल्ड सीन्समुळे म्हणाली की, मी तेव्हादेखील म्हटले होते की ते सीन त्या गोष्टीचा भाग आहे आणि तिच्या अस्तित्वाचा भाग आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ते फँटसी एलिमेंटने आलेले नाही. जर त्या स्क्रिप्टची आणि भूमिकेची गरज असेल तर मी असे सीन करेन. तसेच मला त्यावेळी कोणतीही गोष्ट आक्षेपार्ह वाटत नसेल तर माझी असे सीन द्यायला काहीही हरकत नाही.
ती ट्रोलिंगबद्दल म्हणाली की, ट्रोलिंगचा बोलायचे झाले तर जेव्हा सुरूवातीला १ मिनिटांची क्लिप पाहून लोक टीका करत होते. जेव्हा सीझन लोकांनी पाहिला तेव्हा त्या सीनचे महत्त्व कळले. एक मिनिटांची क्लीप किंवा इंटिमेट सीन हेच तिचे व्यक्तिमत्त्व नाही. त्याहीपेक्षा पलिकडे जाऊन ते पात्र आहे. जेव्हा तुम्ही पात्र स्वीकारता तेव्हा मला नाही वाटत कोणाला प्रॉब्लेम असेल आणि असला तरी तो त्या कामाचा भाग आहे. त्यामुळे मी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही.
मला दोन वर्षांपूर्वी पहिले काही दिवस खूप त्रास झाला होता. मात्र आता मला काहीही फरक पडत नाही. मला असे वाटते की ट्रोलर्सना फक्त बोलायचे असते किंवा लक्ष वेधून घ्यायचे असते म्हणून ते असे करतात. ज्यांना खरंच सीझन आणि पात्रामध्ये इंटरेस्ट असतो ते संपूर्ण सीझन पाहतात आणि मग मी त्यांचे कोणतेही मत असेल तर ते गृहित धरते किंवा समजून घेते. शेवटी कला ही व्यक्तिनिष्ठ आहे.आवड निवड ही व्यक्तीवर अवलंबून आहे. एखादी गोष्ट मला पटली म्हणजे तुला पण पटेल असे नाही होत. तुला नाही पटत आहे ते मी आदरयुक्त स्वीकारेन. पण किमान तुमची मते दुसऱ्यावर लादू नका, असे प्रिया म्हणाली.