Priya Bapat : प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 05:13 PM2023-01-06T17:13:55+5:302023-01-06T17:19:24+5:30
कोकणासोबत प्रियाचं खूप खास नातं आहे. त्याचाच व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही प्रियाचं हे साधं राहणं भलतंच पसंत पडलं आहे.
Priya Bapat : आपल्या गोड हास्याने सर्वांना प्रेमात पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी तर सर्वात लोकप्रिय आहे. तर आपली प्रिया नुकतीच कोकणात गेली आहे. कोकणासोबत प्रियाचं खूप खास नातं आहे. त्याचाच व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही प्रियाचं हे साधं राहणं भलतंच पसंत पडलं आहे.
प्रिया बापटचे आई बाबा मूळचे कोकणातले आहेत. तिचे आजोळच कोकणातले. त्यामुळे कोकणातल्या तिच्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत ज्या तिने पोस्टमधून शेअर केल्या आहेत. तब्बल २० वर्षांनी प्रिया कोकणातल्या घरी गेल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे. कोकणची रोड ट्रिप, कोकणातलं कौलारु घर, सुंदर निसर्ग, पारंब्यांना लटकणं, झाडावर चढणं असा एकंदर आनंद तिने व्हिडिओ पोस्ट मध्ये शेअर केला आहे. बालपणीच्या आठवणीत प्रिया रमली असल्याचं दिसून येतंय.
या पोस्टमध्ये प्रिया म्हणते,'माझे आई -बाबा मूळचे कोकणातले. आई राजापुरची आणि बाबा देवगडचे. त्यामुळे लहानपणी आमच्या प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात असायचो. चुलीवरचा मेतकुट भाताची न्याहारी, झाडावर चढून जांभळं, कैऱ्या चोरणे, दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी गुळ-दाणे सोबत घेऊन पेडावर जाणे, रात्री अंगणात झोपून चांदण्या पाहणे. २० वर्षांनी राजापूरला गेले. जिथे आईचा जन्म झाला, ती मोठी झाली. माझं बालपणं पुन्हा जगले.'
प्रियाचा हा व्हिडिओ चाहत्यांनाही खूप आवडलाय. कोकणातले चाहते तर भलतेच खूश झालेत. कोकणातली मजा काही औरच असते, आमचंही कोकण गाव आहे अशा कमेंट्स तिच्या व्हिडिओवर येत आहेत. प्रिया सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र तरी वेळात वेळ काढून ती कोकणात पोहोचली आणि काही काळ बालपणीच्या आठवणीत रमल्याचे दिसत आहे.