"लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर मी खचले होते", प्रिया बेर्डे भावुक, म्हणाल्या, "माझ्याकडे पैसेही नव्हते, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 01:00 PM2023-08-16T13:00:03+5:302023-08-16T13:00:58+5:30
माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. आता त्या 'सिंधुताई माझी आई-गोष्ट चिंधीची' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत किरण मानेही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'सिंधुताई माझी आई-गोष्ट चिंधीची' मालिकेच्या निमित्ताने प्रिया बेर्डे आणि किरण मानेंनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रिया बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावुक झाल्या होत्या.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांचा सामना कसा केला, याबद्दल प्रिया बेर्डेंनी अमुक-तमुकला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "माझ्या आई-वडिलांचं खूप आधीच निधन झालं होतं. त्यानंतर माझी आजी माझ्या बरोबर होती. तिचं ५ जुलैला निधन झालं आणि त्यानंतर काही महिन्यांतच १६ डिसेंबरला लक्ष्मीकांत बेर्डेही आम्हाला सोडून गेले. त्यानंतर माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली होती. आर्थिक, मानसिक सगळ्याच बाजूने मी खचून गेले होते. दोन मुलं सांभाळायची कशी त्यांना मोठं कसं करायचं, हा प्रश्न माझ्यापुढे होता."
प्रिया बेर्डेंनी या मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतरचा अभिनय आणि स्वानंदी यांचा एक प्रसंगही सांगितला. "एकदा मला स्वानंदीने पप्पा कुठे गेले, असं विचारलं होतं. त्यानंतर अभिनय तिला खिडकीकडे घेऊन गेला. ते स्टार झालेले आपले पप्पा आहेत, असं त्याने तिला सांगितलं. एवढ्याशा मुलाला एवढी अक्कल आहे, हे तेव्हा मला समजलं. पप्पा कधी परत येणार? असं तिने विचारल्यानंतर 'तू दहावीला गेली की ते परत येणार' असं अभिनय स्वानंदीला सांगायचा. त्या दोघांकडे बघून आपल्याकडे सोन्यासारखी मुलं आहेत. आपल्याला यांना मोठं करायचं आहे, असं माझ्या मनात यायचं. मी त्यावेळेस पूर्णपणे खचले होते. माझ्याकडे पैसे नव्हते. मला मार्गही दिसत नव्हता. माझ्या दोन्ही मुलांकडे बघून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला. ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. तो दिवस माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होता," असं प्रिया बेर्डेंनी सांगितलं.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांनी एकत्र अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. 'हम आपके है कौन', 'बेटा', 'एक होता विदुषक', 'शेम टू शेम' अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केलं आहे.