दीड महिन्यानंतर झाली मायलेकाची भेट; प्रसिद्ध मराठी गायिकेचा व्हिडीओ पाहून येईल डोळ्यात पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:32 AM2023-07-14T08:32:32+5:302023-07-14T08:33:08+5:30
Priyanka barve: हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत.
सध्याच्या काळात अनेक स्त्रिया घरासोबतच त्यांचं करिअरदेखील उत्तमरित्या सांभाळतात. यात बऱ्याचदा त्यांना घरासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. तर, काही वेळा करिअरसाठीही मन मारुन काही निर्णय घ्यावे लागतात. यात सध्या एका लोकप्रिय मराठी गायिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या करिअरला प्राधान्य देत ही गायिका तब्बल ४२ दिवस तिच्या चिमुकल्या मुलापासून दूर होती. मात्र, विदेश दौरा करुन परत आल्यानंतर आपल्या बाळाला पाहिल्यावर तिच्या अश्रुंचा बांध फुटला.
सध्या सोशल मीडियावर गायिका प्रियांका बर्वे (priyanka barve) हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत. प्रियांका कामानिमित्त जवळपास दीड महिना विदेशात होती. यावेळी तिचा २ वर्षांचा लेक तिच्यापासून दूर होता. मात्र, इतके दिवस तो आईशिवाय राहू शकला याचं तिला खूप अप्रूप वाटलं. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करत तिने या विदेश दौरा आणि लेकाविषयी भाष्य केलं आहे.
"मुगल ए आजमचे शो संपवून मी 42 दिवसांनी परत आले आहे. मला खूप छान वाटतं. अशा प्रकारे माझा युएस दौरा पार पडला. मला माझ्या लेकाचा खूप अभिमान वाटतोय. तो माझी प्रेरणा आहे. तसंच मला पाठिंबा देणारं एवढं चांगलं कुटुंब मिळालंय याचा मला खूप आनंद होतोय", असं प्रियांकाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका एअरपोर्टवरुन बाहेर पडत आहे. याच वेळी तिचा लहान मुलगा तिच्याकडे धावत येतो आणि तिला बिलगतो. जवळपास दीड महिन्यानंतर लेकाला पाहिल्यानंतर प्रियांकाही भावूक होते. यावेळी तिचा मुलगा तिला विविध प्रश्न विचारतो. या दोघा मायलेकांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, प्रियांका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल आयुष्यात बरेचसे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या लेकाविषयीचे व्हिडीओ, फोटो शेअर करते. प्रियांकाच्या लेकाचं नाव युवान असं असून तो दोन वर्षांचा आहे.