‘बे एके बे’ सिनेमासाठी अभिनेत्री पूर्णिमा बनली निर्माती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 10:39 AM2018-07-30T10:39:23+5:302018-07-30T10:40:09+5:30

काही कलाकार सिनेमा आणि अभिनयाकडे पॅशन म्हणून पाहतात. असे कलाकार सिनेमा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जातात

Produced by actress Purnima, for 'Be A ke Be', a producer | ‘बे एके बे’ सिनेमासाठी अभिनेत्री पूर्णिमा बनली निर्माती

‘बे एके बे’ सिनेमासाठी अभिनेत्री पूर्णिमा बनली निर्माती

googlenewsNext

काही कलाकार सिनेमा आणि अभिनयाकडे पॅशन म्हणून पाहतात. असे कलाकार सिनेमा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जातात. एखादा सिनेमा पूर्ण करण्यासाठी स्वत: निर्मिती करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. या कलाकारांच्या यादीत आता पूर्णिवा वाव्हळ-यादव या अभिनेत्रीचंही नाव सामील झालं आहे. ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती पूर्णिमाने केली असून त्यात छोटीशी भूमिकाही साकारली आहे. 

पूर्णिमाने विकास भगेरीया यांनी साथीने थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्सच्या बॅनरखाली ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती प्रविण गरजे आणि चिंतामणी पंडित यांनी केली आहे. कथा-पटकथा संचित यादव यांनी लिहिली आहे. ‘बे एके बे’ या सिनेमाचा विषय शिक्षण पध्दतीवर भाष्य करणारा आहे. मुलांना कशा प्रकारे शिकवण्याची गरज आहे ते अधोरेखीत करणारा आहे. 

निर्माती बनण्यापूर्वी पूर्णिमाने अभिनयातही आपले कलागुण दाखवले आहेत. तिने यापूर्वी काही महत्त्वाच्या सिनेमांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. यात अरुण नलावडेंसोबत ‘माझी शाळा’, भरत जाधवसोबत ‘एक कुतुब तीन मीनार’, किशोर कदम यांच्यासोबत ‘भाकर’ अशा काही सिनेमांचा समावेश आहे. ‘भाकर’ या सिनेमासाठी २०१६ मध्ये पूर्णिमाला यूएसमध्ये नामिनेटही करण्यात आलं होतं. आता ‘बे एके बे’ या सिनेमातही पूर्णिमाने कथानकला वळण देणारी व्यक्तिरेखा साकारली आहे. 

‘बे एके बे’ची कन्सेप्टच खूप वेगळी असल्याने या सिनेमाकडे मी एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टच्या रूपात पाहिल्याचं पूर्णिमाचं म्हणणं आहे. ती म्हणाली की, या सिनेमाच विषय जेव्हा निवडला, तेव्हा जवळजवळ शंभर जणांशी भेटीगाठी केल्या होत्या, पण कोणीही ठोस होकार दिला नाही. वेळकाढूपणा केला जात होता. त्यांना वास्तव परिस्थितीतील दाहकता मांडण्यात रुची नव्हती, मसालेदार सिनेमा बनवायचा होता. त्यात आयटम साँग हवं होतं. हे सर्व या सिनेमात नाही. त्यामुळे मग मीच पुढाकार घेतला. या सिनेमाच्या निर्मितीसाठी आम्ही आमचं घर गहाण टाकलं आहे. 

मुलांना मुलांच्या कलेनं शिकवणं हा ‘बे एके बे’चा गाभा आहे. विषय खूप आवडल्यामुळे या सिनेमाद्वारे निर्मिती क्षेत्रात का उतरू नये? असा विचार केल्याचं पूर्णिमा म्हणते. गाण्यांच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याची अनोखी पध्दत या सिनेमात आहे. आज अभ्यासक्रम कसा शिकवला जातो हे आपण पाहतो आहोच, पण तेच गाण्यांच्या माध्यमातून शिकवलं गेलं, तर ते सहज त्यांच्या लक्षात राहतं. त्यामुळे गाण्यांतून अभ्यासक्रम शिकवला, तर किती बरं होईल. काही शाळांमध्ये असा अभ्यासक्रम सुरूही करण्यात आला आहे. सगळीकडेच असं झालं तर मुलांवरील भार खूप कमी होईल. 

हा सिनेमा जरी शिक्षण पध्दतीवर भाष्य करणारा असला तरी आम्ही शिक्षणपध्दती बदलायला निघालो आहोत असं मुळीच नसल्याचंही पूर्णिमा म्हणाली. या सिनेमात दाखवल्याप्रमाणे जर शिकवलं गेलं, तर ते कसं सोयीस्कर होईल ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निर्मिती करण्याचा विचार केला. पण हे काम अभिनयाएवढं सोपं नव्हतं. बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करीत आम्ही इथवर पोहोचलो आहोत. 

या सिनेमातील भूमिकेबाबत पूर्णिमा म्हणाली की, निर्मितीसोबतच या सिनेमात मी नायकाच्या बहिणीची भूमिकाही साकारली आहे. ‘मानवसेवा हीच इश्वरभक्ती’ असं म्हणत ती आपल्या भावालाही तेच करायला शिकवते. शहरामध्ये प्रोफेसर बनून पैसे कमावण्यापेक्षा खेडोपाडी जाऊन गोरगरीबांच्या मुलांना शिकवण्याचा सल्ला देते. बहिणीचा सल्ला ऐकून नायकही दुर्गम भागात जाऊन ज्ञानदानाचं कार्य करतो.

Web Title: Produced by actress Purnima, for 'Be A ke Be', a producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.