मुरली अण्णांनी दिल्लीत साजरा केला पिट्या भाईचा वाढदिवस, अभिनेता म्हणतो- "दिवसभर थकूनही रात्री २ वाजता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:17 PM2024-06-11T13:17:37+5:302024-06-11T13:19:38+5:30

पिट्या भाई अशी ओळख मिळवलेल्या अभिनेता रमेश परदेशी यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. रमेश परदेशी यांनी दिल्लीत जाऊन मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर त्यांचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक केलं आहे.

pune mp murlidhar mohol celebrated marathi actor ramesh pardeshi birthday shared video | मुरली अण्णांनी दिल्लीत साजरा केला पिट्या भाईचा वाढदिवस, अभिनेता म्हणतो- "दिवसभर थकूनही रात्री २ वाजता..."

मुरली अण्णांनी दिल्लीत साजरा केला पिट्या भाईचा वाढदिवस, अभिनेता म्हणतो- "दिवसभर थकूनही रात्री २ वाजता..."

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चर्चेत आले आहेत. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक लढवलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि ते पुण्याचे खासदार झाले. खासदारकीची पहिलीच टर्म असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळालं आहे. रविवारी(९ जून) नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात मुरलीधर मोहोळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मुरलीधर मोहोळ यांचे अभिनेता प्रविण तरडे आणि रमेश परदेशी यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

पिट्या भाई अशी ओळख मिळवलेल्या अभिनेता रमेश परदेशी यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. रमेश परदेशी यांनी दिल्लीत जाऊन मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर त्यांचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक केलं आहे. रमेश परदेशी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत पिट्या भाई मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर केक कापत बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत आहे. या व्हिडिओला त्यांनी "वाढदिवस थेट दिल्लीत ते पण कोण तर केंद्रीय मंत्री मुरली अण्णा", असं कॅप्शन दिलं आहे. 

"केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन दिवसभर थकून सुद्धा पहाटे दोनला माझ्या वाढदिवशी केक कापलाच...परंपरा नाही मोडली...याला म्हणतात दोस्ती. थेट दिल्लीत...तरडे आणि दया लव्ह यू", असं रमेश परदेशी यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

मुरलीधर मोहोळ मूळचे मुठा (ता. मुळशी) गावचे. कोल्हापुरात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, शहर भाजप सरचिटणीस, पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य (२००२), महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक (२००७, २०१२, २०१७), महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद (२०१७-२०१८) त्यांनी भूषवले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून (२०१७-१८) त्यांनी काम केले. २०१९-२२ ते पुण्याचे महापौर होते. अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पीएमपीएमएल संचालक, पीएमआरडीए सभासद होते. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक २०१९ मध्ये लढवली होती. भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यंदा प्रथमच त्यांना पुण्याचे खासदार होण्याचा मान मिळाला आहे.

Web Title: pune mp murlidhar mohol celebrated marathi actor ramesh pardeshi birthday shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.