पूर्वी भावेच्या नव्या गाण्याची ही आहे खासियत, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 07:15 AM2019-08-04T07:15:00+5:302019-08-04T07:15:00+5:30
पूर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे
अभिनेत्री आणि नृत्यांगना पूर्वी भावेच्या ‘अंतर्नाद’ डान्स सिरीज मधले भज गणपती हे पहिले गाणे लोकांच्या पसंतीस उतरल्यावर आता ह्या सीरिजमधले दुसरे गाणे ‘धागा प्रेम का’ नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याची विशेषता म्हणजे या गाण्याचं दिग्दर्शन ‘पुष्पक विमान’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर यांनी केले आहे.
ह्या गाण्याविषयीअभिनेत्री पुर्वी भावे सांगते, “भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे मी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ह्या नृत्यशैलीत पहिला आणि ह्याच नृत्यशैलीत दुसराही व्हिडीओ आला आहे. युगानुयुगांपासून पारंपारिक शास्त्रीय कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवल्या गेल्या आहेत. आत्ताच्या पिढीपर्यंत भरतनाट्यम हा नृत्यप्रकार पोहचावा यासाठी युट्युब हे उत्तम माध्यम आहे.
एखाद्या कलेची सिरीज करत असताना त्यात विविध प्रकारच्या भावभावनांचा अंतर्भाव केला पाहिजे. म्हणून ‘अंतर्नाद’ डान्स सिरीजमधल्या दुस-या गाण्यामध्ये एक प्रेमकथा दाखवली गेली आहे. ''
‘धागा प्रेम का’ या गाण्यात रहीम दास ह्यांचे दोन लोकप्रिय दोहे आहेत. ‘प्रेमाचा धागा तोडू नये, तुटला तर गाठ पडते’. अशा आशयाचे हे गाणे आहे. गाण्यात नृत्यांगना आणि मृदुंग वादक या जोडीची प्रेमकथा भरतनाट्यमच्या माध्यमातून सांगितली आहे. गाण्याला पूर्वी भावेची आई आणि शास्त्रीय सुप्रसिध्द गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे.