पुष्कर श्रोत्री अशा प्रकारे साजरा करणार आपला ५०वा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 06:30 AM2019-04-28T06:30:00+5:302019-04-28T06:30:00+5:30
यशाची उत्तुंग शिखर गाठली तरी काही कलावंत आपली मातीशी असलेली नाती कधी विसरत नाहीत. समाजाशी त्यांनी तरीही आपला ऋणानुबंध जपलेला असतो.
यशाची उत्तुंग शिखर गाठली तरी काही कलावंत आपली मातीशी असलेली नाती कधी विसरत नाहीत. समाजाशी त्यांनी तरीही आपला ऋणानुबंध जपलेला असतो. मराठी चित्रपटसृष्टीत दोन दशकाहून अधिक यशस्वी कारकीर्द असणारे लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री यांचा येत्या ३० एप्रिल रोजी ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्ताने, ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये पुष्कर श्रोत्री यांच्या सध्या सुरु असलेल्या ‘आम्ही आणि आमचे बाप’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘हसवा फसवी’ या तीन नाटकांचा महोत्सव आज होणार आहे. महोत्सवातील तीनही प्रयोगाचे उत्पन्न सामाजिक संस्थांना दिले जाणार आहे.
आदी कल्चरटेन्मेंट निर्मित ‘आम्ही आणि आमचे बाप’ या पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांच्या साहित्य संपदेला अभिवादन करत पुनरुज्जीवित करणारी ही एक नाट्यकृती असून सकाळी ११ वा. सादर होणाऱ्या या पहिल्या प्रयोगाचे उत्पन्न ठाण्यातील ‘सिग्नल शाळा’ या संस्थेला देण्यात येईल. ट्रॅफिक सिग्नलवर भिक मागणाऱ्या व फुल, वस्तू विकणाऱ्या लहान मुलांना साक्षर बनविण्याच कार्य ही संस्था करते. तसेच बदाम राजा निर्मित ‘अ परफेक्ट मर्डर’ या दुपारी ४ वा. सादर होत असलेल्या दुसऱ्या प्रयोगाचे उत्पन्न कोल्हापुरातल्या ‘चेतना’ संस्थेला दिले जाईल. गतिमंद आणि विकलांग मुलांना विविध कला शिकवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यात या संथेचे मोठे योगदान आहे. तर रात्री ८.३० वा. जिगिषा-अष्टविनायक निर्मित दिलीप प्रभावळकर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हसवा-फसवी’ चा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाचे उत्पन्न अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या संकल्पनेतून कर्जेत येथे उभ्या राहणाऱ्या ‘कलाश्रय’ या वृद्धाश्रमाच्या स्थापनेसाठी दिले जाणार आहे.
दिवसभर चालणाऱ्या ‘पुष्कर शो THREE’ या नाट्य महोत्सवातून प्रत्येक संस्थेला जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याचा पुष्कर श्रोत्री यांचा मानस आहे. अभिनेता म्हणून आपण मला आजपर्यंत दाद दिली आहे, या प्रयोगाच्या निमित्ताने मला साथ देऊन प्रयोग हाऊसफुल करावेत असे आवाहन पुष्कर श्रोत्री यांनी केले आहे.