'रानबाजार' फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी अद्याप आहे सिंगल, लग्नाबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:31 AM2022-05-26T10:31:40+5:302022-05-26T10:32:12+5:30
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची बहुचर्चित वेबसीरिज 'रानबाजार' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील आतापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज रानबाजार (RaanBaazaar Webseries) नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज रिलीज होण्याआधीपासूनच चर्चेत आली होती. या सीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यामुळे सीरिजसोबत या दोघीही खूप चर्चेत आल्या आहेत. या सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. दरम्यान एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने अद्याप ती सिंगल असल्याचे सांगितले. तसेच तिने तिच्या लग्नाबद्दल खुलासा देखील केला.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका वाहिनीला मुलाखतीत सांगितले की, मी अद्याप तरी लग्नाबाबत काही विचार केलेला नाही. किमान दोन वर्ष तरी मी लग्न करणार नाहीये. सध्या मी सिंगल आहे. त्यामुळे प्राजक्ता माळी सध्या लग्न करणार नाही असे दिसते आहे.
प्राजक्ता माळी रानबाजारमधील भूमिकेबद्दल सांगते, “यापूर्वी मी अशा प्रकारची भूमिका कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी 'बबली' इमेज बदलली आहे. रत्ना साकारणे मुळीच सोप्पे नव्हते. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझे वजन वाढवले. रत्ना ही एक वेश्या आहे. त्यामुळे तिची देहबोली, चालणे- बोलणे, तिचे राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याचा मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवार पेठेत आणि मुंबईतील कामाठीपुरात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांचे निरीक्षण केले. शारीरिक बदलासोबतच मला माझी मानसिकताही बदलावी लागली आणि त्यातूनच ही रत्ना समोर आली. अनेकांनी माझ्या या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. काहींनी नाराजीही व्यक्त केली. परंतु या नाराजीकडे मी सकारात्मकतेने बघतेय. ही 'रत्ना'ची पोचपावती आहे.''
रानबाजारमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितशिवाय उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.