'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!'चा मुहूर्त राज ठाकरेंच्या हस्ते संपन्न. संस्कृती बालगुडे दिसणार मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 19:11 IST2020-12-21T19:10:22+5:302020-12-21T19:11:02+5:30
८ दोन ७५ या चित्रपटात शुभांकर तावडे आणि संस्कृती बालगुडे प्रमुख भूमिकेत आहेत.

'८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!'चा मुहूर्त राज ठाकरेंच्या हस्ते संपन्न. संस्कृती बालगुडे दिसणार मुख्य भूमिकेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप नुकताच देण्यात आला. उत्तम स्टारकास्ट आणि महत्त्वाचा विषय असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात सुरू करण्यात आले आहे.
उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुश्रुत भागवत दिग्दर्शन करत आहेत. तर चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.
अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप देऊन चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ' मनसेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त होणं आनंददायी आहे. आता पुढील काही दिवसांत पुणे आणि परिसरात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येईल,' असं दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितलं. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेनं या पूर्वी राजकीय आणि प्रेमकथा असलेल्या कागर या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर सुश्रुत भागवत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असे एकदा व्हावे हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.