अशी सुरू झाली होती रमेश देव व सीमा देव यांची प्रेमकहाणी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 09:56 PM2022-02-02T21:56:47+5:302022-02-02T22:31:59+5:30
Ramesh Deo passes away : रमेश देव यांची चित्रपट कारकिर्द खूप मोठी राहिली आणि या अख्खा कारकिर्दीत एक व्यक्ती कायम सावलीसारखी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ती म्हणजे रमेश देव यांच्या अर्धांगिणी सीमा देव.
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची आज हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. आयुष्यभर सिनेमा आणि अभिनयला वाहिलेल्या रमेश देव यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 285 हिंदी सिनेमे, 190 मराठी चित्रपट, 30 नाटकं, 250 जाहिराती आणि अनेक मालिकांमध्ये झळकलेल्या रमेश देव यांची चित्रपट कारकिर्द खूप मोठी राहिली आणि या अख्खा कारकिर्दीत एक व्यक्ती कायम सावलीसारखी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ती म्हणजे रमेश देव यांच्या अर्धांगिणी सीमा देव.
1962 मध्ये रमेश देव यांनी अभिनेत्री नलिनी सराफ (सीम देव) यांच्यासोबत लग्न केलं. या वर्षी या लग्नाला 59 वर्षे पूर्ण होणार होती. रमेश देव आणि सीमा देव या जोडप्यानं अनेक सिनेमात एकत्र काम केलं. एकत्र काम करता करता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात पहिल्यांदा दोघांनी एकत्र काम केलं आणि इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली होती.रमेश देव हे सीमा यांच्या पेक्षा 12 वर्षांनी मोठे होते. एकीकडे रमेश देव यांचं करिअर ऐन भरात होतं. तर दुसरीकडे नलिनी सराफ हे नाव नावारुपाला येत होतं. चित्रपटासांठी नलिनीने सीमा हे नाव स्वीकारलं होतं.
1960 साली ‘जगाच्या पाठीवर’ रमेश देव आणि सीमा यांना साईन करण्यात आलं. हा या जोडीचा पहिला सिनेमा. सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर तब्बल दोन दशकं रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केलं. या दोघांचे अनेक चित्रपट नंतर चांगलेच गाजले. 1962 मध्ये त्यांनी ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात सोबत काम करताना रमेश देव सीमा यांच्या नकळत प्रेमात पडले. या चित्रपटावेळीच दोघांनाही एकमेकांवर प्रेम झालं.
सीमा यांच्या आई प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यासोबत असत. त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्याची संधीच रमेश यांना मिळेना. पण एक दिवस त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी शायराना अंदाजात आपलं प्रेम व्यक्त केलं.
नंतर कशाचाही उशीर न करता त्यांनी त्याच वर्षी लग्न केलं. 2013 मध्ये या जोडीच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली, यावेळीदेखील दोघांमधील प्रेम तेवढंच ताज टवटवीत असल्याचं अख्ख्या जगानं पाहिलं होतं.
पहिली भेट होती फारच रंजक
सीमा सिनेमात काम मिळावं म्हणून आईसोबत ऑडिशन द्यायला निघाल्या होत्या. चर्नी रोडवरून त्या लोकलमध्ये चढल्या. त्यावेळी सीमा फक्त 15 वर्षांच्या होत्या. ग्रँटरोडवर रमेश देवही याच लोकलमध्ये चढले. त्यावेळी त्यांचा ‘आंधळा मागतो क डोळा’ नुकताच प्रदर्शित झाला असल्याने लोक त्यांना ओळखू लागले होते. या सिनेमात रमेश यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. सीमा यांनी त्यांना पाहताच त्यांना ओळखलं आणि आईला सांगितलं. हाच तो आंधळा मागतो एक डोळाचा दृष्ट खलनायक, असं त्या आईला म्हणाल्या. यावर आईनं त्यांना रागावून त्यांच्याकडे बघू नकोस म्हणून सांगितलं. सीमा यांनी मोग-याचा गजरा केसात माळला होता आणि त्याचा सुगंध डब्यात पसरला होता. संपूर्ण डबा रिकामा असतानाही रमेश देव हटकून सीमा यांच्या बाजूला जाऊन बसले. ते पाहून सीमा यांच्या आई रागावल्या. यावर सगळा डबा तुम्ही विकत घेतला आहे का? असा सवाल रमेश यांनी त्यांना केला. सीमाच्या आई काय बोलणार, त्या प्रतिप्रश्नाने त्या बिचा-या शांत बसल्या. हीच रमेश आणि सीमा यांची पहिली भेट होती.