रणवीर सिंगच्या 'सिम्बा'मध्ये झळकणार तब्बल 11 मराठी कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:15 AM2018-12-26T07:15:00+5:302018-12-26T07:15:00+5:30
धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिम्बा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत
धर्मा प्रॉडक्शन्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्सचा चित्रपट सिम्बा सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये रणवीर सिंह, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव हे अकरा मराठी कलाकारही महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
सध्या रणवीर-सारासोबत प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, “रोहितसर मनाने राजा माणूस आहेत. ते ‘ब्लॉकबस्टर फिल्ममेकर’ आहेत. हे मला त्यांच्यासोबत ‘गोलमाल’ चित्रपट करतानाच कळले होते. त्यानंतर मराठी सिनेमात प्रचंड व्यस्त झाल्याने त्यांनी ऑफर केलेले पुढचे दोन सिनेमे मी करू शकलो नाही. पण सिम्बाने ती कसर भरून काढली. आणि ह्यावेळेस तर करण जोहरसारख्या निर्मात्यासोबत काम करायची संधी मिळाली.”
सिध्दार्थ पुढे सांगतो, “रणवीर सिंहसारख्या सुपरस्टार्सने माझा वाढदिवस साजरा करावा, किंवा मला आपल्या लग्नाचे आमंत्रण द्यावे, एवढे मला आपलेसे मानण्याने मी खूप भारावून गेलो आहे. आणि ह्यासगळ्यात दुग्ध शर्करा योग होता, तो म्हणजे मराठी सिनेसृष्टातले अनेक उत्तमोत्तम कलाकार ह्या सिनेमाचा हिस्सा होते. मी ब-याचदा मस्करीत म्हणतो, रोहितसरांनी एक मराठी फिल्म बनवलेय. ज्यामध्ये रणवीर सिंह आणि सारा अली खान आहेत.”
वैदेही परशुरामी सिंबा चित्रपटामध्ये ‘आकृती’ ह्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती सिंबाच्या अनुभवाविषयी म्हणाली, “सिंबासाठी जेव्हा मला बोलवण्यात आलं होतं. तेव्हा मला विश्वासच बसला नाही. कोणीतरी माझी मस्करी करतंय, असंच मला वाटलं होतं. पण जेव्हा मी रोहितसरांना भेटले तेव्हा मला पाहताच ते म्हणाले होते, हिच ‘सिंबा’मधली आकृती आहे. सिनेमा स्विकारल्यावर मला रणवीर, सारा, आणि इतर मराठी कलाकारही ह्या सिनेमाचा हिस्सा असल्याचे कळले.”
सिम्बामध्ये अकरा मराठी कलाकार असण्याबद्दल वैदेही पूढे म्हणते, “रोहितसरांना मराठी कलाकारांविषयी विशेष प्रेम आहे. मराठी कलाकारांमध्ये जो आपलेपणा आणि जो प्रोफेशनल एटिट्युड असतो, तो सरांना खूप आवडतो. रोहितसरांसकट त्यांची संपूर्ण टिम खूप मेहनती आहे. आणि त्यांच्यासोबत प्रत्येक कलाकाराने एकदातरी काम करायला हवे.”
रोहित शेट्टी ह्यांच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक दिसलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी काळसेकर. रोहित शेट्टींच्यासोबत सहाव्यांदा काम करणा-या अश्विनी काळसेकर म्हणतात, “ मी रोहित शेट्टी ह्यांना हिट मशीन म्हणते. त्यांच्या परिसस्पर्शाने प्रत्येक चांगल्या कथानकाचा उत्तम सिनेमा बनतो. आणि तो सुपरहिट होतो. रोहित शेट्टी ह्यांची शिस्त, वक्तशीरपणा आणि त्यांच्यातला सळसळता उत्साह ह्यातून मी कलाकार म्हणून समृध्द होत गेले. सिंबामूळे मला रणवीर सिंहसोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि रणवीरकडून मी कळत-नकळत खूप शिकले. त्याच्या एवढा भूमिकेचा अभ्यास करणारा कलाकार मी पाहिला नाही. मला असं वाटतं, सिंबा ही फक्त हिट नाही तर ‘तोड-फोड’ हिट फिल्म असेल.”
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, “मी सिंघममध्ये रोहितसरांसोबत काम केले होते. आणि त्यानंतर आता सिंबामधून पून्हा एकदा त्यांच्यासोबत काम करता आलं. अजय देवगन आणि रणवीर सिंह ह्या दोन सुपरस्टार्ससोबत काम करण्याचा खूप वेगळा अनुभव होता. अजयसर जेवढे शांत तेवढाच रणवीर बोलका. रोहितसर आणि त्यांच्या टीमसोबत काम करताना मला अडचणींवर मात करताना व्यक्तिमत्वात आवश्यक असलेली सकारात्मकता शिकायला मिळाली.”
अशोक समर्थ म्हणतात, “मला माझ्या आयुष्यातली पहिली कमर्शिअल हिट फिल्म पाहायला मिळाली, ती रोहित शेट्टींमूळेच. सिंघममुळे मी 100 कोटी क्लबमध्ये गेलो. सिंघम ते सिंबा हा अविस्मरणीय प्रवास आहे. भारतीय सिनेसृष्टीतला आघाडीचा नट रणवीर सिंहकडून आपल्या अगोदरच्या सिनेमातल्या अभिनयाविषयी कौतुकाची थाप मिळावी, ही माझ्यासारख्या अभिनेत्यासाठी तर आनंदाचीच बाब होती. रोहितसरांना मी त्या आघाडीच्या दिग्दर्शकांमधला मानतो, ज्यांना आपल्या नटांकडून चोख परफॉर्मन्स काढून घेता येतो.
रोहित शेट्टीच्या सिनेमात पाचव्यांदा काम करणारे विजय पाटकर म्हणतात, “अभिनेत्यांकडून चांगला अभिनय करून घ्यायचा असेल, तर त्यांना रिलॅक्स करावे लागते, हे रोहित शेट्टी ह्यांना चांगले माहित आहे. मला रोहितशेट्टींचे काटेखोरपणे काम करणे आवडते. मराठी नटांसोबत काम करताना मजा येते, असं नेहमी रोहित शेट्टी म्हणतात.”