'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारीला प्रतिष्ठेच्या "अरविंदन" पुरस्काराचा सन्मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:05 AM2018-02-27T04:05:14+5:302018-02-27T09:35:14+5:30

कैरो, इफ्फी, कोलकाता अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'रेडू' या चित्रपटाचा दिग्दर्शक सागर वंजारीला अजून एक सन्मान प्राप्त झाला ...

'Redu' director Sagar Vanjari honors the prestigious "Arvindan" award! | 'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारीला प्रतिष्ठेच्या "अरविंदन" पुरस्काराचा सन्मान!

'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारीला प्रतिष्ठेच्या "अरविंदन" पुरस्काराचा सन्मान!

googlenewsNext
रो, इफ्फी, कोलकाता अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'रेडू' या चित्रपटाचा दिग्दर्शक सागर वंजारीला अजून एक सन्मान प्राप्त झाला आहे. मल्याळम् भाषेतील श्रेष्ठ दिग्दर्शक जी. अरविंदन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार यंदा सागर वंजारीला जाहीर झाला आहे. १५ मार्चला अरविंदन यांच्या स्मृतीदिनी तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनी हा पुरस्कार मराठी चित्रपट दिग्दर्शकाला मिळणार आहे. 

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केरळ चलत् चित्र अकादमीतर्फे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.यंदा या पुरस्काराचे २७वे वर्ष आहे. या पूर्वी १९९६मध्ये दोघी या चित्रपटासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, २००८मध्ये हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटासाठी परेश मोकाशी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे हा पुरस्कार मिळवणारा सागर वंजारी हा तिसराच मराठी दिग्दर्शक आहे. सागरला मिळालेल्या पुरस्कारासह 'रेडू' चित्रपटाचीही सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी निवड झाली. भारतभरातून मराठी, मल्याळम् सह अनेक चित्रपटांतून 'रेडू' आणि सागरची निवड करण्यात आली. या पुरस्काराच्या निमित्तानं मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. 

मुळचा संकलक असलेल्या सागर वंजारीनं आतापर्यंत १५०हून अधिक शॉर्टफिल्मचं संकलन केलं आहे. तर जवळपास १२हून अधिक चित्रपटाचं संकलन केलं आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट, रंगा पतंगा, घाट अशा मराठी चित्रपटांसह मैथिली, इंग्रजी, तेलुगू आदी विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. रेडू हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्यानंच या चित्रपटाचं संकलनही केलं आहे. नवल फिल्म्सच्या नवलकिशोर सारडा यांनी सागरच्याच ब्लिंक मोशन पिक्चर्सच्या सहकार्यानं रेडूची निर्मिती केली आहे. चित्रपटात शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल आदींच्या भूमिका आहेत. महत्त्वाचं म्हणजे, रेडू हा मालवणी बोलीभाषेतला चित्रपट आहे.

पुरस्काराविषयी सागर म्हणाला, 'महान दिग्दर्शक अरविंदन यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे माझं भाग्य आहे. माझ्यावर मल्याळम् चित्रपटांचा प्रभाव आहे. अरविंदन यांच्यासह अदूर गोपालकृष्णन यांच्यासारख्या अनेक मल्याळम् दिग्दर्शकांचे चित्रपट पहात आलो आहे. आजवर मी अनेक चित्रपट केले. मात्र, मला पहिल्यांदाच पुरस्कार मिळतो आहे. तोही अरविंदन पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद शब्दांत मांडता येण्यासारखा नाही. या पुरस्काराच्या रुपाने मराठी चित्रपट, मराठी-मालवणी भाषा यांचा सन्मान झाला आहे.' 'रेडू या चित्रपटाला महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं आहे. तसंच तो लवकरच प्रदर्शितही होणार आहे,' असंही सागरनं सांगितलं. 

Web Title: 'Redu' director Sagar Vanjari honors the prestigious "Arvindan" award!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.