'झपाटलेला'मध्ये तात्या विंचूला मृत्यूंजय मंत्र देणारा 'बाबा चमत्कार' आठवताहेत?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:54 IST2025-02-04T11:52:20+5:302025-02-04T11:54:07+5:30
Zapatlela Movie : 'झपाटलेला' या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते.

'झपाटलेला'मध्ये तात्या विंचूला मृत्यूंजय मंत्र देणारा 'बाबा चमत्कार' आठवताहेत?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
झपाटलेला (Zapatlela Movie) हा सिनेमा रिलीज होऊन आज अनेक वर्षे उलटली आहेत तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. महेश कोठारे दिग्दर्शित हा चित्रपट खूप गाजला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना नक्कीच होते. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. बाबा चमत्कार ही भूमिका राघवेंद्र कडकोळ (Raghvendra Kadkol) यांनी साकारली होती.
झपाटलेला सिनेमाच्या काही वर्षानंतर त्याचा सीक्वल रिलीज झाला होता. त्यातदेखील बाबा चमत्कारची भूमिका राघवेंद्र कडकोळ यांनीच निभावली होती. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत बरेच वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत काम केले. त्यांनी अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते यांसारख्या अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून राघवेंद्र कडकोळ यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती.
या कारणामुळे नौदलात भरती होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
खरेतर त्यांना नौदलात भरती व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी परीक्षा देखील दिली होती. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना जहाजावर पाठवण्यात आले होते. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांची पुन्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यात त्यांच्या कानात दोष असल्याचे कारण देत त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले होते. त्यांच्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता. पण खचून न जाता त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी नाटकांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. करायला गेलो एक या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. ते नाटक सांभाळून नोकरी करत होते. पण नाटकांच्या दौऱ्यामुळे सतत सुट्ट्या घ्याव्या लागत असल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली होती.
वयाच्या ८३ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे ४ फेब्रुवारी, २०२१ साली दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. राघवेंद्र कडकोळ यांना बालगंधर्व जीवन पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे 'नटवर्य केशवराव दाते पुरस्काराने' गौरवण्यात आले होते. त्यांनी गोल्ड मेडल नावाचे पुस्तक लिहिले आहे.