एका अपघातामुळे बरबाद झाले अशोक सराफ यांच्या प्रियतमाचे आयुष्य, मदतीसाठी लोकांसमोर हात पसरवण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:19 PM2021-02-11T13:19:44+5:302021-02-11T13:31:35+5:30
'धुमधडाका'सह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह 'भटकभवानी' या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय 'शराबी', 'नमक हलाल' अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे.
अशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग तुम्हाला लक्षात असेलच. 'धुमधडाका' या मराठी सिनेमातील हा गाजलेला डायलॉग. या सिनेमात अशोक सराफ प्रियतमा प्रियतमा म्हणत डान्स करत सीमाच्या मागे मागे असतात हेही आपण एन्जॉय केलं आहे. मात्र अशोक सराफ यांची हीच ऑनस्क्रीन ‘प्रियतमा सीमा’ सध्या रिअल लाइफमध्ये हलाखीचं जीणं जगत आहे.
रुपेरी पडद्यावर सीमा साकारणा-या या अभिनेत्रीचं खरं नाव सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे असं आहे. 'धुमधडाका'सह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह 'भटकभवानी' या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय 'शराबी', 'नमक हलाल' अशा हिंदी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे. अमिताभ बच्चन, निळू फुले, परवीन बाबी, जयश्री गडकर यांच्यासारख्या कलाकारांसह त्यांनी स्क्रीन शेअर केला आहे.
मात्र बिग बींच्या मर्द या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान त्या घोड्यावरुन पडल्या. या अपघातात त्यांच्या पाठीचे हाड मोडले अन् भरात असलेल्या करिअरला अनपेक्षित ब्रेक लागला. या दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं. काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली. नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणलीय.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने C ग्रेड कलाकारांना मिळणारी पेन्शन त्यांना मिळते. काही दिवसापुर्वी त्या हयात आहेत का ? याची माहिती घेण्यासाठी त्यांना मंत्रालयातून फोन करण्यात आला होता. पेन्शन बंद होईल या भितीने आपण अजून हयात आहोत हे सांगण्यासाठी त्या मंत्रालयातील आल्या होत्या. तुटपुंजं पेन्शन मिळवून उदनिर्वाह करणं त्यांना कठीण जात आहे.अखेर मंदिराबाहेर येणा-या जाणा-या भक्तांकडेच मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आज त्यांच्यावर आली आहे.