कौतुकास्पद! रिंकू राजगुरूने वाढदिवस साजरा न करता वाटले ३०० कुटुंबांना नेब्युलायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 01:18 PM2021-06-04T13:18:50+5:302021-06-04T13:24:00+5:30
सध्या कोरोनाचे संकट असल्याने रिंकूने तिचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला. एवढेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा काल २०वा वाढदिवस होता. रिंकूचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूजमध्ये झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने सिनेइंडस्ट्रीला रिंकू राजगुरू ही नवीन अभिनेत्री मिळून दिली. अभिनयाशी काहीही संबंध नसताना रिंकूने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सैराटमधून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. इतकेच नाही तर पदार्पणातच तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सध्या कोरोनाचे संकट असल्याने रिंकूने तिचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला. एवढेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वाफ घेण्याचे मशीन देण्याचा निर्णय रिंकूने आणि तिच्या पालकांनी घेतला. महाळुंग परिसरात असलेल्या मायनर, मुंडफणेवाडी, भोसलेवस्ती, काळेवस्ती, घारमाळकरगट, रेडेवस्ती, जमदाडेवस्ती, लाटेवस्ती, श्रीपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हे मशिनचे वाटप रिंकूच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिंकू सोबत जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षक, संबंधित कर्मचारी रिंकूचे पालक उपस्थित होते.
सैराट चित्रपटानंतर रिंकूने कागर, मेकअप या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तिने लारा दत्ता सोबत हंड्रेड या वेबसीरिजमध्ये काम केले. या सीरिजमध्ये तिने साकारलेली नेत्रा पाटील प्रेक्षकांना चांगलीच भावली. तसेच ती अनपॉज्ड या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हिंदी चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये ती दिसली होती.