'मुंबईत एकटं राहायला लागल्यावर...', २४ वर्षीय रिंकू राजगुरुने व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:56 PM2024-08-12T15:56:26+5:302024-08-12T15:57:09+5:30
काही वर्षांपूर्वीच रिंकू आता मुंबईत एकटीच राहत आहे. हा अनुभव तिने नुकताच शेअर केला.
मराठमोळी अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) 'सैराट' सिनेमानंतर रातोरात स्टार झाली. या पहिल्याच सिनेमाने तिचं नशीबच बदललं. खूप कमी वयात तिला हे यश मिळालं. रिंकू सातवीपर्यंतच शाळेत गेली तर आठवीत असताना तिने सैराट सिनेमाचं शूट केलं. सिनेमाच हिट झाल्यानंतर रिंकूची फॅन फॉलोइंग वाढली. तसंच काही वर्षांपूर्वीच रिंकू आता मुंबईत एकटीच राहत आहे. हा अनुभव तिने नुकताच शेअर केला.
एकटं राहत असताना जर कधी अस्वस्थ वाटलं तर काय करते? यावर Whyfal पॉडकास्टमध्ये रिंकू म्हणाली, "अकलूजला घरी असताना मला असं कधी जाणवलं नाही किंवा कोणी मला जाणवू दिलं नाही. पण मुंबईत आता राहतीये तर अशा वेळी घरील जाऊन येते म्हणजे बरं वाटेल हा एक पर्याय असतो. त्यात मी अशी मुलगी आहे की मला जर आता कसंतरी होतंय, मला रडायला येतंय, मला एकटं वाटतंय तरी मी नाही सांगत. मी एकटीच असते. गाणी ऐकेन, जरा वेळ रस्त्यावर फिरुन येईन असंच करत मी मन रमवतं. आईला फोन करुन तिचा आवाज ऐकला तरी शांत वाटतं. किंवा मैत्रिणीला कॉल करुन गप्पा मारणं हेच मी करते."
रिंकूला तिच्या आयुष्यातलं ध्येय कोणतं आहे विचारल्यावर ती म्हणाली, "मला फक्त आता चांगली कामं करायची आहे. तसंच मुंबईत स्वत:चं घर आणि गाडी मला घ्यायची आहे. हा गोल मी स्वत:साठीच सेट केला आहे. तसंच मला प्रवास करायचा आहे कारण मी फक्त आई बाबा आणि भावासोबत राहिले आहे. त्यामुळे आता सगळ्यांसोबत बोलायचं म्हणलं की मला दडपण येतं. हे मला कमी करायचं आहे."
रिंकूने तिच्या या ध्येयापैकी तिचं गाडी घेण्याचं एक स्वप्न नुकतंच पूर्ण केलं आहे. तिने सोशल मीडियावर नव्या कोऱ्या कारसोबतचे फोटो शेअर केले. यानंतर तिचं सर्वांनी अभिनंदन केलं. रिंकू काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'झिम्मा 2' मध्ये झळकली. तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.