रिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 18:17 IST2018-08-20T18:09:38+5:302018-08-20T18:17:27+5:30
अभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रिंकू राजगुरू म्हणते की 'ह्या' सिनेमातील माझी भूमिका खूप वेगळी
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेता आकाश ठोसर व अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी पहिल्याच सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटातील आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एका वृत्तपत्राला मुलाखत देताना रिंकू म्हणाली की, ''सैराट'पेक्षा 'कागर'मधील माझी भूमिका खूप वेगळी आहे. पण या सिनेमातील माझ्या भूमिकेला आर्चीच्या छटा आहेत. मकरंद सरांनी मला या सिनेमाची कथा वाचून दाखवताच क्षणी मला ती आवडली. अनेक सिनेमांच्या प्रोजेक्ट्सवर सध्या मी काम करत असून याबाबतची अधिक माहिती लवकरच सांगेन. 'कागर' सिनेमाला माझी संमती देण्यापूर्वी याबबात मी नागराज मंजुळे सरांकडून पूर्ण मार्गदर्शन घेतले होते. तसेच या भूमिकेबाबतही आमच्यात बरीच चर्चा झाली होती. मला मार्गदर्शन करण्यात नागराज सर नेहमीच तत्पर असतात. तसेच 'सैराट'ची आमची संपूर्ण टीम नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असते.'
'कागर' सिनेमामधील रिंकूच्या लूकची यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. तिने या सिनेमासाठी बरेचसे वजन घटवले आहे. याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. सर्वांना तिने 'कागर' सिनेमासाठी वजन घटवले असे वाटत असले तरी या वजनाच्या प्रक्रियेसाठी फार पूर्वीपासूनच मी तयारी सुरू केली होती, असे रिंकूने सांगितले.
रिंकूला नृत्य फार आवडते. लहानपणापासून नृत्य ही रिंकूची आवड आहे. आगामी 'कागर'मध्ये तिचे नृत्यसुध्दा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'सैराट'नंतर रिंकूला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.