रिंकू राजगुरूच्या मेकअप या नव्या चित्रपटाचा टीजर लाँच, वेगळ्या अंदाजात दिसतेय रिंकू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:51 IST2019-05-20T18:50:35+5:302019-05-20T19:51:30+5:30
रिंकू राजगुरूचा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे नाव मेकअप असे आहे.

रिंकू राजगुरूच्या मेकअप या नव्या चित्रपटाचा टीजर लाँच, वेगळ्या अंदाजात दिसतेय रिंकू
सैराट या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू स्टार बनली. तिला केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभर लोकप्रियता मिळाली. सैराट या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील केले होते. रिंकूला एकाच चित्रपटामुळे प्रचंड स्टारडम मिळाले. तिच्या फॅन्सची संख्या प्रचंड आहे. या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी तिचा कागर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटाला सैराट इतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.
कागर या चित्रपटानंतर रिंकूचा पुढचा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. रिंकूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिचा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे नाव मेकअप असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडितने केले असून या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या टीजरमध्ये रिंकूचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
या टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे. हा टीजर पाहून ग्रामीण भागातील मुलगी शहरात आल्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडते हे पाहायला मिळेल असा अंदाज लावला जात आहे. या टीजरमध्ये रिंकूचा गाम्रीण लहेजा ऐकायला मिळत असून हा चित्रपट खूपच रंजक वाटत असल्याची प्रतिक्रिया हा टीजर पाहून तिचे चाहते देत आहेत.
सैराटला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर घराच्या बाहरे पडणे देखील रिंकूला शक्य होत नव्हते. एवढेच काय तर शाळेत जाताना देखील लोक गर्दी करत असल्याने तिने शाळा सोडून प्रायव्हेट शिक्षण घेणे पसंत केले. रिंकूला पहिल्याच चित्रपटात मिळालेली लोकप्रियता अनेकांना अनेक चित्रपटानंतर देखील अनुभवता येत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.