Ved Marathi Movie box office collection : रितेश भाऊचा नाद खुळा! बॉक्स ऑफिसवर ‘वेड’चा धुमाकूळ, तीन दिवसांत इतकी केली कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:14 PM2023-01-02T15:14:09+5:302023-01-02T15:14:19+5:30
Ved Marathi Movie box office collection Day 3: होय, भाऊ-वहिनींच्या ‘वेड’ या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं आहे. कमाईचे आकडे पाहून तुम्हालाही खात्री पटेल...
Ved Marathi Movie box office collection Day 3: रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) व जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh) यांच्या ‘वेड’ (Ved) या मराठी सिनेमानं सर्वांना वेड लावलं आहे. होय, या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत रितेशच्या या सिनेमाने दमदार कमाई केली आहे.
‘वेड’ या सिनेमात रितेश व जिनिलिया मुख्य भूमिकेत आहेत. रितेशने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे, शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. रिलीजआधी या सिनेमाची जोरदार चर्चा होती. सिनेमाच्या गाण्यांनीही धूम केली होती. अशात कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर शुक्रवारी (30 डिसेंबर) हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकला आणि या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. आता या सिनेमाने तीन दिवसांत केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
2022 ends with a BANG 🔥🔥🔥… #Marathi film #Ved - which marks the directorial debut of #RiteishDeshmukh - takes a SOLID START on Day 1 and witnesses REMARKABLE GROWTH on Day 2 and 3… Fri 2.25 cr, Sat 3.25 cr, Sun 4.50 cr. Total: ₹ 10 cr. pic.twitter.com/qJLDx4MHBc
— taran adarsh (@taran_adarsh) January 2, 2023
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘वेड’च्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 3.25 कोटींवर आणि तिसऱ्या दिवशी 4.50 कोटींवर पोहोचला. तीनच दिवसांत या सिनेमाने एकूण 10 कोटी कमाई केली आहे. ‘वेड’च्या कमाईचे हे आकडे मराठी चित्रपटसृष्टीत नवं चैतन्य निर्माण करणारे आहेत. येत्या दिवसांत हा चित्रपट कमाईचा आणखी मोठा आकडा पार करेल, अशी आशा जाणकार व्यक्त करत आहेत.
अशी आहे कथा
क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि त्याच्या सच्चा प्रेमाची गोष्ट वेड या सिनेमात पाहायला मिळते. शेखरअण्णा नावाचा गुंड सत्याचा पक्का वैरी आहे. तो का आणि कसा याची कथा चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सत्याचे श्रावणीसोबत लग्न झालेलं आहे. लग्नाला सात वर्षे होऊन दोघांमध्ये एक दरी आहे. बेकार असलेला सत्या कायम दारू आणि सिगारेटच्या नशेत असतो. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते, सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते, पतीसाठी वडीलांसोबतही भांडते. असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का याची उत्तरं 12 वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात, जी थिएटरमध्ये पहायला मजा येईल.