Ved Movie Box Office Collection Day 6: सुसाट! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने सहाव्या दिवशीही केली दमदार कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:40 PM2023-01-05T15:40:38+5:302023-01-05T15:40:45+5:30
Ved Movie Box Office Collection Day 6: चित्रपटातील रितेश व जिनिलियाची केमिस्ट्री अफलातुन आहेत. प्रेक्षक या जोडप्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत....
Ved Movie Box Office Collection Day 6: ‘वेड’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकजी आहेत. साऊथच्या ‘मंजिली’ या सिनेमाचा रिमेक असला तरी या चित्रपटातील रितेश व जिनिलियाची (Riteish Deshmukh and Genelia Deshmukh ) केमिस्ट्री अफलातुन आहेत. प्रेक्षक या जोडप्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत. रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. त्याच्या दिग्दर्शनाचंही भरभरून कौतुक होतंय. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आणि उदंड प्रतिसादामुळे ‘वेड’ या सिनेमाच्या कमाईची घोडदौड सहाव्या दिवशीही जोरात चालू आहे. ऑल-टाइम टॉप 5 ओपनिंगनंतर ‘वेड’ या चित्रपटाने सहाव्या दिवशीही तगडी कमाई केली आहे.
‘वेड’ सिनेमा 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. राज्यभरातील 250 स्क्रिनवर हा चित्रपट रिलीज झाला असून त्याला 1000 शो मिळाले आहेत. सिनेमा प्रदर्शित होताच राज्यातील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. सहाव्या दिवशीही हा सिनेमा गर्दी खेचतोय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून ‘वेड’च्या कमाईचे आकडे जाहीर केले.
#Marathi film #Ved continues to surprise with SUPERB HOLD on weekdays… Eyes ₹ 20.50 cr [+/-] in *Week 1*, which is FANTASTIC… Fri 2.25 cr, Sat 3.25 cr, Sun 4.50 cr, Mon 3.02 cr, Tue 2.65 cr, Wed 2.55 cr. Total: ₹ 18.22 cr. pic.twitter.com/K2aMh4iz26
— taran adarsh (@taran_adarsh) January 5, 2023
पहिल्या दिवशी या सिनेमाने 2.25 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 3.25, तिसऱ्या दिवशी 4.50 कोटी, चौथ्या दिवशी 4.50 कोटी तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने 2.65 कोटींचा बिझनेस केला. काल बुधवारी सहाव्या दिवशी या चित्रपटाने 2.55 कोटींचा बिझनेस केला. सहा दिवसांत या चित्रपटाने 18.22 कोटी कमावले आहेत. पहिल्या आठवड्यात ‘वेड’ हा चित्रपट 20 कोटींचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
‘वेड’ या सिनेमात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रितेश देशमुख याने दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे.