राजकारणातले "राजहंस" विलासराव देशमुख यांचा बायोपिक येणार ? रितेश म्हणाला - "सिनेमाची स्क्रिप्ट..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 01:08 PM2024-08-14T13:08:51+5:302024-08-14T13:10:13+5:30
राजकारणातले एक दिलखुलास व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी आहे.
Genelia and Riteish Deshmukh : राजकारणातले एक दिलखुलास व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री (Vilasrao Deshmukh) स्व.विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी आहे. राजकारणातले राजहंस अशी त्यांची ओळख होती. त्यांची अदा, भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची भुरळ विरोधकांना देखील होती. आजही जेव्हा विलासराव देखमुख यांचा विषय असतो, तेव्हा विरोधकांची भूमिका ही देखील नरमाईची असते. त्यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी महाराष्ट्राची जनता उत्सुक आहे. वडिलांच्या बायोपिकवर नुकतेच एका मुलाखतीमध्ये अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) भाष्य केलं.
रितेशने काही दिवसांपुर्वीच मुंबई टाईम्सला मुलाखत दिली होती. यावेळी मुलाखतीमध्ये रितेशला प्रश्न विचारण्यात आला की "तुझे वडील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे राजकीय, सामाजिक कार्य मोठे आहे. त्यांच्या जीवनावर सिनेमा व्हावा असा कधी विचार केला आहेस का?". यावर उत्तर देताना रितेश म्हणाला, "मी स्वतः तसा विचार केलेला नाही. परंतु, मध्यंतरी काही जण माझ्याकडे सिनेमाच्या स्क्रिप्ट घेऊन आले होते. 'आम्ही स्क्रिप्ट लिहितो. तुम्ही त्यावर सिनेमा करा" अशीही विचारणा झाली, पण मी त्याबाबत ठोस काही ठरवेललं नाही. योग्य वेळी त्याचा विचार नक्की करेन".
आज विलासराव देशमुखांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रितेश-जिनिलीयाने भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. रितेशचं वडिलांबरोबर फारच जवळचं नातं होतं. वडिलांच्या जाण्याचं दु:ख त्याच्या मनात आजही कायम आहे. तो कायम त्याच्याबाबत बोलत असतो. रितेश अनेकदा आपल्या वडिलांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो. गेल्या फेब्रुवारी महिन्यात विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा लातूरमध्ये पार पडला होता. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. या कार्यक्रमात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बोलत असतानाच वडिलांची आठवण सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
दरम्यान, विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील बाभळगाव नावाच्या गावात झाला होता. तर 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं होतं. विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. बाभळगाव ते मुंबई आणि मुंबई ते राजधानी दिल्ली असा ऐतिहासिक प्रवास विलासराव देशमुख यांनी केला. आज विलासरावजींच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवताना या इतिहासाची आठवण अनेकांना झाल्याशिवाय राहत नाही.