मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 04:57 PM2022-07-10T16:57:13+5:302022-07-10T16:57:58+5:30
Riteish deshmukh: असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या रितेशने नुकतीच वेड या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
सलमान खान (salman khan) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. जवळपास ९० च्या दशकापासून सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळेच आज त्याची लोकप्रियता सातासमुद्रापारी असल्याचं पाहायला मिळतं. समलान त्याच्या उत्तम अभिनयशैलीसह दिलदारपणामुळेही तितकाच ओळखला जातो. आजवर सलमानने अनेक कलाकारांना, कलाविश्वातील अन्य व्यक्तींना मदत केली आहे. अशीच मदत त्याने अभिनेता रितेश देशमुखला (riteish deshmukh) केली असून रितेशने भाईजानसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्राचा लेक आणि उत्तम अभिनेता म्हणून रितेशने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या रितेशने नुकतीच 'वेड' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच या चित्रपटासाठी त्याला भाईजानची कशा प्रकारे साथ मिळाली हे देखील सांगितलं आहे.
"आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की, मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे .अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो", असं रितेश म्हणाला.
पुढे तो म्हणतो, " अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे . आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच... चित्रपटगृहात !!, अशी पोस्ट रितेशने शेअर केली आहे."
दरम्यान, 'वेड'च्या माध्यमातून रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करतोय. तर जेनेलिया १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करतीये. त्यामुळे या चित्रपट दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.