"राज ठाकरेंनी मला ताबडतोब घरी बोलावलं आणि..."; रितेश देशमुखने सांगितला 'लय भारी' किस्सा
By देवेंद्र जाधव | Updated: February 3, 2025 09:20 IST2025-02-03T09:19:25+5:302025-02-03T09:20:13+5:30
राज ठाकरे यांच्यासोबत भेटीचा खास किस्सा रितेश देशमुखने विश्व मराठी संमेलनात सांगितलाय (raj thackeray, riteish deshmukh)

"राज ठाकरेंनी मला ताबडतोब घरी बोलावलं आणि..."; रितेश देशमुखने सांगितला 'लय भारी' किस्सा
विश्व मराठी संमेलन २०२५ ची काल सांगता झाली. यावेळी मंत्री उदय सामंत, अभिनेते सयाजी शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) उपस्थित होते. रितेशने यावेळी भाषणात सर्वांसमोर राज ठाकरेंविषयी जाहीर कबूली दिली. रितेशचा पहिला सिनेमा होता 'लय भारी'. हा सिनेमा मिळवण्यात राज ठाकरेचं (raj thackeray) कसं योगदान होतं, याचा खास किस्सा रितेशने सांगितला.
रितेशला असा मिळाला 'लय भारी' सिनेमा
रितेशने विश्व मराठी संमेलन २०२५ मध्ये भाषण देताना सांगितलं की, "मी पहिला मराठी चित्रपट केला त्याचं नाव लय भारी. या चित्रपटाची कथा पहिल्यांदा राज ठाकरेजींनी मला ऐकवली होती. त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले कुठे आहेस? मी म्हटलं घरी आहे. ते मला म्हणाले घरी ये. मी विचारलं कधी? ते म्हणाले आता! यांच्याकडे उद्या-परवा, पुढच्या आठवड्यात असं काही नसतं. जे काय करायचं असतं ते आता करायचं असतं. म्हणून जे काय होतं ते सोडून त्यांच्या मी घरी गेलो. घरी गेल्यावर मला म्हणाले, एक गोष्ट तुला सांगायची आहे. मी म्हटलं ठीकेय, कधी बसूया? ते म्हणाले आता."
"फार कमी लोक असतात ज्यांना चित्रपटाचं नरेशन त्यांच्याकडून मिळतं. कारण राजजींच्या मनात एक दूरदृष्टी होती की, मराठीमध्ये असे चित्रपट व्हायला हवेत. मी त्यावेळेस दुसरा मराठी चित्रपट करत होतो. ते म्हणाले की तो चित्रपट करु नको हा चित्रपट कर. हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. तू नक्की हा चित्रपट कर. आणि तिथे खऱ्या अर्थाने माझ्या मराठी चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली." अशाप्रकारे रितेशने लय भारी किस्सा सांगितला.