"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:49 AM2024-05-07T11:49:39+5:302024-05-07T11:50:00+5:30
"वडील गेल्यानंतर आईच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली", रितेश देशमुख भावुक
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा रितेश मुलगा आहे. देशमुख घराण्याच्या या लेकाने राजकारण सोडून अभिनयाची वाट धरली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश देशमुखने अभिनय, करिअर आणि त्याबरोबरच कुटुंबाबद्दल भाष्य केलं.
रितेशने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणीत तो भावुक झाला. त्याने या मुलाखतीत आई वैशाली देशमुख यांच्याबद्दलही भाष्य केलं. रितेश म्हणाला, "माझी आई हाऊसवाइफ होती. त्यांनी घर सांभाळलं. आमच्या तिन्ही भावाचं शिक्षण हे त्यांच्यामुळे झालं. माझे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत आणि मी अभिनयात. पण, आमचा पाया हा आईमुळे भक्कम झाला. आम्हाला इंग्रजी शाळेत घालण्याचा निर्णयही आईचाच होता."
"वडील जाऊन आज १२ वर्ष झाली. पण, या १२ वर्षात सगळ्यात मोठा गॅप हा आईच्या आयुष्यात आला. मुलांची लग्न झालीत. आम्ही कामात बिझी आहोत. पण, या वयात तिने शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि लातूरमध्ये त्या आता प्रगतशील शेती करत आहेत. आई नवनवीन प्रयोग करत राहतात. आणि मला याचा अभिमान वाटतो. या सगळ्यात मी किंवा माझ्या भावंडांची तिने मदत घेतलेली नाही. तिने ठरवलं आणि केलं," असंही त्याने सांगितलं.
देशमुख फॅमिली हे महाराष्ट्राचं लाडकं कुटुंब आहे. रितेश आणि जिनिलीया हे सिनेसृष्टीबरोबरच महाराष्ट्रातीलही लोकप्रिय कपल आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांना महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ओळखलं जातं.