‘व्हॅलेंटाईन्स डे 'च्या रंगात रंगले अक्षया आणि संदीप, या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 04:03 PM2019-02-11T16:03:02+5:302019-02-11T16:04:55+5:30
अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं’ या उक्तीला अनुसरून स्वतःच्या प्रेमासाठी लढणाऱ्या एका युवकाची कथा ‘रॉकी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
साधारण फेब्रुवारी महिना उजाडला की वातावरणाला गुलाबी रंग चढू लागतो. त्यामागचं कारणही तसंच खास आहे. जगभरातील प्रेमी युगुलं ‘व्हॅलेंटाईन्स डे’ साजरा करण्यासाठी सज्ज झालेली असतात. या गोड-गुलाबी रंगाची झलक मराठी चित्रपटात दिसली नाही तर नवलच. ‘रॉकी’ या आगामी मराठी चित्रपटाला एका हळुवार प्रेमकथेची पार्श्वभूमी आहे. अॅक्शन, रोमान्स, ड्रामा आणि इमोशनने परिपूर्ण असलेला ‘रॉकी’ येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं’ या उक्तीला अनुसरून स्वतःच्या प्रेमासाठी लढणाऱ्या एका युवकाची कथा ‘रॉकी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून संदीप साळवे आणि अक्षया हिंदळकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘मुळात प्रेमाला विश्वासाची साथ मिळाली की त्याच्या जोरावर माणूस काहीही साध्य करू शकतो, हेच आम्ही ‘रॉकी’ चित्रपटातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेवा आणि त्याला साथ द्या.’ असा संदेश चित्रपटाची नायिका अक्षया हिंदळकर हिने दिला तर ‘प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे. ‘रॉकी’ची कथा सुद्धा प्रेमाच्या पार्श्वभूमीवर खुलत जाते. पण प्रेमाकडे संकुचित दृष्टीकोनातून न बघता त्याची व्यापकता आपण जाणून घेतली पाहिजे.’ अशा भावना संदीप साळवे याने व्यक्त केल्या.
पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर आहेत. दिग्दर्शन अदनान ए.शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए.शेख व विहार घाग यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.