आशयाला अॅक्शनचा तडका – दिग्दर्शक ‘अदनान ए शेख’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:12 PM2019-03-04T15:12:15+5:302019-03-04T15:14:15+5:30
दिग्दर्शक हा चित्रपटाचा सारथी असतो. चित्रपटाचा संपूर्ण लगाम हा दिग्दर्शकाच्या हातात असतो, त्यामुळे चित्रपटाचा रथ उधळायचा की तो डौलाने ...
दिग्दर्शक हा चित्रपटाचा सारथी असतो. चित्रपटाचा संपूर्ण लगाम हा दिग्दर्शकाच्या हातात असतो, त्यामुळे चित्रपटाचा रथ उधळायचा की तो डौलाने पुढे न्यायचा हे पूर्णतः दिग्दर्शकावर अवलंबून असते. ‘रोल..कॅमेरा..अॅक्शन..’ या दिग्दर्शकाच्या तीन शब्दांच्या हुकमावरून सेटवरची सर्व सूत्रे हलण्यास सुरुवात होते. चित्रपटाच्या कथेला, पटकथेला, आणि त्यातल्या कलाकारांना एका सूत्रात बांधण्याचं काम हा दिग्दर्शक करत असतो. त्यामुळेच चित्रपटाच्या यशाचं गमक हे दिग्दर्शकाच्या हातात असतं. त्यातूनच हिंदीतले अनेक प्रस्थापित निर्माते, दिग्दर्शक, मराठीकडे वळत आहेत.
‘अदनान ए. शेख’ हे बॉलिवूड मधले एक प्रसिद्ध दिग्दर्शक, येत्या ८ मार्चला 'रॉकी' हा मराठी अॅक्शनपॅक्ड चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नट होण्याचं स्वप्न मनात घेऊन अदनान यांनी या चमचमत्या चंदेरी, स्वप्नील दुनियेत पाऊल ठेवलं. या क्षेत्रातल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी सहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले पण त्यांच्यातली क्षमता आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा ध्यास यामुळे त्यांना नवी नवी क्षितिजं खुणावत होती. स्वतःची महत्वाकांक्षा, जिद्द, स्वतःला सिद्ध करण्याचा आत्मविश्वास यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतले सुप्रसिद्ध दिग्दर्शक ‘अहमद खान’ यांनी ‘अदनान ए. शेख’ यांना स्वतःच्या चित्रपटासाठी दिग्दर्शनात सहाय्य करण्याची संधी दिली. मोठ्या कष्टाने या चित्रपट क्षेत्रात आपल करियर घडवू इच्छिणाऱ्या ‘अदनान ए. शेख’ यांच्यासाठी ही संधी अत्यंत मोलाची होती. ‘अहमद खान’ यांच्यासोबत काम करणारे ते पहिले सहाय्यक दिग्दर्शक आहेत. यानंतर ‘अदनान ए. शेख’ यांनी कधीही मागे वळून पहिले नाही. गेली अनेक वर्ष ते अहमद खान यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, जॉन अब्राहम, अशा हिंदी इंड्स्ट्रीतल्या नामवंत कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.
कामाप्रती निष्ठा आणि चिकाटी यामुळे अहमद खान यांच्या प्रत्येक प्रोजेक्टचा ‘अदनान ए. शेख’ हे अविभाज्य भाग बनले. सुपरहिट ‘बागी २’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शनही ‘अदनान ए. शेख’ यांनी केले आहे. कलासक्त माणूस हा सतत नावीन्याच्या शोधात असतो, त्यामुळे हिंदीत यश आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर तिथेच न थांबता अदनान ए. शेख हे आता दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या 'रॉकी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी अदनान शेख यांनी एकहाती सांभाळली आहे.
'नवंनवीन प्रयोग करणे हे मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना अगदी अचूक माहीत आहे. त्यांनी केलेले प्रयोग ते सक्षमपणे निभावतातसुद्धा, पण मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मनोरंजनासोबत प्रबोधन देणारा मराठी चित्रपट अॅक्शनच्या बाबतीत मागे आहे. काही मोजके अॅक्शनपट सोडले तर एक्शन मसाल्यासाठी मराठी चित्रपटांचा प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळतो. म्हणूनच एक नवीन प्रयोग करण्यासाठी आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला अॅक्शनचा तडका देण्यासाठी मी 'रॉकी' हा अॅक्शनपॅक्ड चित्रपट मराठीत घेऊन येत आहे. एक वेगळा जॉनर मी या चित्रपटात हाताळला आहे. यात प्रेम आहे, रोमान्स आहे, अॅक्शन आहे, इमोशन आहे, ड्रामा आहे. हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पॅकेज आहे, त्यामुळे मला खात्री आहे की प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडेल.’ असा विश्वास अदनान ए. शेख यांनी व्यक्त केला.
‘रॉकी' चित्रपटाची प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंटची असून निर्मिती ड्रीम् विव्हर व सेव्हन सीज् प्रोडक्शन्सची आहे. या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. ऍक्शन, इमोशन आणि रोमान्सने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, शशिकांत कारेकर, दीप्ती भागवत, या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत आपल्या तडफदार अभिनयाने भूमिकेला न्याय देणारा 'संतोष जुवेकर' पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘रॉकी’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांनी मराठीत काम केले आहे.
या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू आशर असून दिग्दर्शन अदनान ए. शेख यांचे आहे.
चित्रपटाचे कथालेखन अदनान ए. शेख यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान ए. शेख यांची आहे. छायांकन फारुख खान यांनी केले आहे. राहुल राऊत, मंदार चोळकर, जय अत्रे, सचिन पथक, संदीप पाटील यांनी चित्रपटाची गीतं लिहिली असून समीर साप्तीस्कर, वासीम सदानी यांचे संगीत गीतांना लाभले आहे. आनंद शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, जावेद अली, पलक मुच्चल, गीत सागर, ज्योतिका टांगरी या हिंदी मराठी सिनेसृष्टीतल्या नामवंत गायकांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. सुनिता त्रिपाठी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.