नाट्यगृह चालविणे म्हणजे हत्ती पोसणे - प्रशांत दामले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:11 AM2023-05-22T08:11:03+5:302023-05-22T08:11:15+5:30
नाट्यगृहांवर सोलर लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : रत्नागिरीतील नाट्यगृहात एसी आणि साऊंड सिस्टीम योग्य नसल्याने एकीकडे अभिनेते भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही नाट्यगृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील नाट्यगृहे फारशी चांगली नसून, ती सुधारायला हवीत. आजच्या घडीला नाट्यगृह चालविणे म्हणजे एकप्रकारे हत्ती पोसण्यासारखेच आहे, असेही ते म्हणाले. कल्याणमध्ये रविवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत भाष्य केले.
दामले पुढे म्हणाले की, नाट्यगृह आणि उद्यान या दोन गोष्टी नागरिकांसाठी आहेत. प्रत्येक नाट्यगृहावर सोलरबसवून घ्या जेणेकरून विद्युत खर्च वाचेल. यातून नाट्यगृहावरचा खर्च कमी होईल.
मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत ही मंडळी नाटकवेडी आहेत. त्यांना नाटकाविषयी आस्था आहे. नुकत्याच झालेल्या भेटीत हा सोलर सिस्टीमचा विचार त्यांच्यासमोर मांडला आहे. नाट्यगृह सुधारण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दामले यांनी सांगितले.