'सावधान, पुढे गाव आहे' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर झाले प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 08:00 AM2019-03-16T08:00:00+5:302019-03-16T08:00:00+5:30
‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
आपला देश बहुतांशी गावांमध्ये वसतो. भली मोठी शहरे विकसित झाली असली तरी त्यांची पोटे गावांमुळेच भरली जातात कारण आपल्या कृषीप्रधान देशातील तीन चथुर्तांश जनता शेती करते. शहरांमध्ये आयुष्य व्यतीत करणारे बरेचजण पहिला मौका मिळताच आपल्या गावी जातात, मनःशांती मिळवायला. खरेतर काँक्रीट जंगलामध्ये राहिल्यावर गावाकडच्या हिरवळीची ओढ अजूनच वाढते. त्यातच जे परदेशात स्थायिक झालेत त्यांना तर आपला देश, आपले गाव नेहमीच खुणावत असते. तिथल्या आठवणी तिथेच जन्मलेल्या आपल्या मुलांना सांगत ते आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. पालकांच्या डोळ्यात दिसणारे गावाचे प्रेम पाल्यांना नक्कीच गावाला भेट देण्यासाठी खुणावत असते. अशाच एकाची गोष्ट ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे.
हा चित्रपट एक सामाजिक संदेशही देऊ पाहतो. प्रवास करताना शक्यतो प्रत्येकालाच ‘सावधान, पुढे गाव आहे’ अशी पाटी दिसलीच असेल. पुढे गाव आहे की गाव पुढे आहे या शक्यतांचा विचार दिग्दर्शकाने प्रगल्भतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘सावधान, पुढे गाव आहे’ या पाटीवर गिधाड बसलेले आढळून येते. त्यामुळे चित्रपटाच्या विषयात गूढताही असण्याची शक्यता आहे. ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची प्रस्तुती मीना शमीम फिल्म्सची आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून त्यामुळे प्रेक्षकांची त्याबाबत उत्कंठा वाढली आहे.
एका अनोख्या विषयावरील ‘सावधान, पुढे गाव आहे’ मध्ये रहस्य आणि उत्कंठा यांचे मिश्रण असणार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.