'गुलकंद' निमित्ताने सचिन गोस्वामी-सचिन मोटे पुन्हा एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:45 IST2025-03-22T14:44:43+5:302025-03-22T14:45:02+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे ही जोडी घराघरात पोहोचली. दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे.

sachin goswami and sachin mote gulkand movie sai tamhankar prasad oak film release on 1st may | 'गुलकंद' निमित्ताने सचिन गोस्वामी-सचिन मोटे पुन्हा एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

'गुलकंद' निमित्ताने सचिन गोस्वामी-सचिन मोटे पुन्हा एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे ही जोडी घराघरात पोहोचली. दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे. वेगवेगळ्या शोज, मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले. मात्र आता ही जोडी एक वेगळा जॉनर घेऊन मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडगोळीची अनोखी जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहाता हा एक फॅमकॉम असल्याचे दिसतेय. 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, "प्रेमाचा गोडवा चाखवणारा 'गुलकंद' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा हा खूप वेगळा चित्रपट आहे. आजवर आम्ही फक्त कॉमेडीवरवर काम केले आहे, परंतु हा आमचा वेगळा प्रयत्न आहे. अर्थात या चित्रपटाच्या कथेला विनोदासोबतच भावनिकतेची जोड आहे. दोन कुटुंबांची ही कथा आहे. आमचा हा 'गुलकंद'चा गोडवा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल." 

तर लेखक सचिन मोटे म्हणतात, "सचिन गोस्वामी आणि मी एकत्र काम करण्याचा अनुभव कमाल असतो.इतकी वर्षं एकत्र काम केल्याने एकमेकांना नेमके काय हवे आहे, हे लगेच कळते. त्यामुळे एकत्र काम करणे सोपे जाते. आजवर आम्ही विनोदी कार्यक्रमांवर जास्त भर दिला परंतु 'गुलकंद' वेगळा आहे. यात गंमत आहे, प्रेम आहे, भावना आहेत. एकंदरच मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, ज्याचा आनंद सगळ्या कुटुंबाने एकत्र घ्यावा". 

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित 'गुलकंद' या चित्रपटात वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया चित्रपटाचे निर्माते आहेत.

Web Title: sachin goswami and sachin mote gulkand movie sai tamhankar prasad oak film release on 1st may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.