‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 04:03 PM2023-12-05T16:03:07+5:302023-12-05T16:03:58+5:30

सचिन-संतोषची जोडी पुन्हा येणार

Sachin Pilgaonkar and santosh pawar marathi actors will work together after 18 years | ‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी

‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी

‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने मराठी अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी हजेरी लावली. यावेळी मंचावर बोलताना ते म्हणाले, पुढल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. या चित्रपटासाठी पुन्हा एकदा मी आणि संतोष पवार एकत्र काम करणार आहोत. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर वेळेत पूर्ण करून पुढल्या वर्षीच तो रसिकांना पाहायला मिळेल, असं म्हणत अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगला. या प्रयोगाला ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल, ज्येष्ठ दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी, निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगावकर, त्यांच्या मातोश्री सुनीला शरद पिळगावकर, बहीण तृप्ती, दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेता संजय खापरे, अरुण कदम, पूर्णिमा अहिरे, निर्मात्या मानसी केळकर, किरण केळकर आदी मंडळी उपस्थित होती. 

यावेळी सचिन म्हणाले की, हा प्रयोग नसून सोहळा आहे. प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी या वयात नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला याचं कौतुक वाटतं. आम्हा सर्व मराठी कलावंताकरिता ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी हे नाटक इथपर्यंत पोहोचवलं असून, तेच या नाटकाला पुढेही नेणार आहेत. अडीच तास पूर्ण एनर्जीसह मनोरंजन करणं ही साधी गोष्ट नाही. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकातील मर्म कायम ठेवून संतोषने शेवटी डोळ्यांत पाणी आणल्याचेही पिळगावकर म्हणाले.

कोरोनापूर्वी रंगभूमीवर आलेले हे नाटक नंतर पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत संतोष म्हणाला की, मित्र निर्माता दत्ता घोसाळकर सोडून गेल्याने त्या चक्रात अडकलो. कॉलेजचा मित्र किरण केळकर माझ्याकडे आला, तेव्हा मी स्लीप डिस्कने आजारी होतो. तालमीलाही बेड असायचा. झोपून तालीम केली. आज हे नाटक शंभराव्या प्रयोगापर्यंत पोहोचल्याचा आनंद आहे. विजय केंकरे म्हणाले की, संतोष पवार हा एक असा दिग्दर्शक आहे, ज्याने स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार केला. त्याची एनर्जी अफलातून आहे. 

अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. दिग्दर्शक विजय केंकरे,अभिनेत्री मंगला केंकरे, अभिनेता संजय खापरे आदी मंडळी उपस्थित होती.

Web Title: Sachin Pilgaonkar and santosh pawar marathi actors will work together after 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.