'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:16 PM2024-07-10T12:16:14+5:302024-07-10T12:16:52+5:30

आजही 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी याबाबत भाष्य केलं.

sachin pilgaonkar on ashi hi banwa banwi 2 said this superhit movie sequel not possible without laxmikant berde | 'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

८०-९०च्या दशकातील गाजलेल्या मराठी सिनेमांपैकी एक म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. आजही हा सिनेमा तितकाच आवडीने पाहिला जातो. लिंबू कलकरची साडी, हा माझा बायको पार्वती, धनंजय माने इथेच राहतात का?, नवऱ्याने टाकलंय हिला...सिनेमातील या डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही मोजक्या सुपरहिट सिनेमांपैकी 'अशी ही बनवाबनवी' सिनेमा एक आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ रे या चौकटीने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. त्यामुळेच आजही या सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. 

सचिन पिळगावकरांनी 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे अनेकदा त्यांना 'अशी ही बनवाबनवी २'बाबत विचारणा झाली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. सचिन पिळगावकर यांनी रेडिओ सिटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना 'अशी ही बनवाबनवी'च्या सीक्वलबाबत प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना ते म्हणाले, "हा सिनेमा लक्ष्याशिवाय नाही बनू शकत. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील नाहीये. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे 'अशी ही बनवाबनवी'च्या टीममधील अनेक लोक आज आपल्यात नाहीत. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर सिनेमा पुढे जाऊ शकत नाही". 

"काही काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात. त्यापलीकडे त्या असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा चित्रपट मी बनवलाय, असं मी म्हणूच शकत नाही. हा चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला. आणि लोकांनी तो मोठा केला," असंही पुढे सचिन पिळगावकर म्हणाले. 

'अशी ही बनवाबनवी' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, लीलाबाई काळभोर, विजू खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमावर आणि त्यातील कलाकारांवर आजही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात. 

Web Title: sachin pilgaonkar on ashi hi banwa banwi 2 said this superhit movie sequel not possible without laxmikant berde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.