सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरचा ‘पाँडीचेरी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 06:22 PM2022-02-12T18:22:39+5:302022-02-12T18:29:04+5:30
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar )या दोघीही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar )या दोघीही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. लवकरच दोघींचा सिनेमाही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘पाँडीचेरी’ हा त्यांचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केलं आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे.या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक सचिन कुंडलकर चित्रपटाबद्दल सांगतात, ''हा एक वेगळा विषय आहे. टिझरवरून हा चित्रपट लव्ह ट्रायंगल वाटत असला तरी चित्रपटाचा हा विषय अजिबात नाही. हा एक भावनिक प्रवास असून या तिघांच्या नात्याचा शेवट कुठे होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक अष्टपैलू कलाकार एकत्र आले आहेत. ही अनोखी भावनिक कथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.''