सई ताम्हणकरने तिच्या चाहत्यांना केलं हे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:01 PM2019-04-22T17:01:32+5:302019-04-22T17:20:00+5:30
सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांनासाठी श्रमदानाचे महत्त्व पटवून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ मे रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार आहे आणि तिने आपल्या चाहत्यांनासाठी श्रमदानाचे महत्त्व पटवून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
पाणी फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणी टंचाईविरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्रदिनी श्रमदान करणार आहे. सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे.
श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष असणार आहे. सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात हिस्सा घेते. पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानाशिवाय वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांनाही सई आवर्जुन उपस्थित असते. याविषयी सई ताम्हणकर सांगते, "पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणाऱ्या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणाऱ्या बायकांसाठी आणि करपणाऱ्या शेतांसाठी मी या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या परिने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही यात सहभागी व्हा."
सईप्रमाणेच स्पृहा जोशीदेखील पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात सहभागी होणार आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र हे चित्रीकरण आटोपून ती लवकरच परतणार आहे. स्पृहा जोशी गेल्यावर्षी देखील पुरंदर तालुक्यातल्या पोखर या गावात श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवायही पाणी फाऊंडेशनच्या वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांना स्पृहा सक्रिय सहभागी होती. स्पृहा 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते, “मुंबई-पुण्यातल्या सुखवस्तू आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांचे आयुष्य पाणी फाऊंडेशनच्या मोहिमेमुळे मला जवळून पाहायला मिळाले. पाणी फाऊंडेशनसोबत दुष्काळाशी दोन हात करताना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघटित होणारे, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना एक सुखद अनुभव मिळतो.”