सई ताम्हणकरने असा साजरा केला तिचा वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:04 PM2018-07-02T16:04:03+5:302018-07-02T17:30:12+5:30
यंदा सई ताम्हणकर वाढदिवसाच्या दिवशी तिचा चित्रपट लव्ह सोनियाच्या प्रिमियरसाठी लंडनला गेली होती. त्यामुळे तिच्या फॅन्सनी ती लंडनहून परतल्यावर तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला.
सई ताम्हणकरचा नुकताच वाढदिवस झाला. तिचा वाढदिवस 25 जूनला असतो. यंदा सई वाढदिवसाच्या दिवशी तिचा चित्रपट लव्ह सोनियाच्या प्रिमियरसाठी लंडनला गेली होती. त्यामुळे तिच्या फॅन्सनी ती लंडनहून परतल्यावर तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला.
सई आणि तिचा फॅन क्लब सई होलिक्स दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका गावात वृक्षारोपण करून तिचा वाढदिवस साजरा करतात. यंदा त्यांनी पुण्याजवळच्या उरळीकांचनमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
सईच्या सर्व चाहत्यांनी वृक्षारोपण झाल्यावर केक कापून आणि तिला भेटवस्तू देऊन तिला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रभरातून सईचे 50 हून अधिक चाहते वृक्षारोपण करण्यासाठी उरळीकांचनमध्ये एकत्र आले होते. विशेष म्हणजे गिफ्ट शॉपमधून सईसाठी भेटवस्तू न आणता प्रत्येकाने हॅंडमेड गिफ्ट्स सईला दिली. ज्यामुळे सई खूप भारावून गेली होती. आपल्या भावना व्यक्त करताना सईचा फॅन अभिजीत मुरूडकर सांगतो, “मी गेली दोन वर्षं सई होलिक्सशी संबंधित आहे आणि गेली 10 वर्षं सईचा फॅन आहे. जेव्हा मी वृक्षारोपणासाठी घरातून निघालो, तेव्हा माझ्या आईची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. ती म्हणाली, आजपर्यंत हिरोईनच्या नादाला लागून लोक फुकट जातात असं ऐकलं होतं. पण माझ्या मुलावर तर चांगले संस्कार होताना मी पाहतेय. आम्हाला आमच्या घरच्यांकडून आणि मित्रमैत्रिणींकडून अशा उपक्रमांसाठी नेहमीच पाठिंबा मिळतो.”
सई होलिक्ससोबत वाढदिवस साजरा करायला मिळाला असल्याने सई खूप खूश होती. ती सांगते, “भेटवस्तू देऊन आणि केक कटिंग करून तर सगळ्याच सेलेब्सचे चाहते वाढदिवस साजरा करतात. पण मला खूप अभिमान आहे की, माझे चाहते समाजोपयोगी उपक्रमातून माझा वाढदिवस साजरा करतात आणि अभिजीतच्या आईच्या प्रतिक्रियेने तर मला हुरूप आला. माझी इच्छा आहे, माझ्या चाहत्यांनी असे उपक्रम वारंवार राबवावेत. माझा त्यांना नेहमीच पाठिंबा असेल.”
सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.