Medium Spicy Movie Review : नातेसंबंधांवरील 'निस्सीम' प्रेमाची रेसिपी 'मीडियम स्पायसी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 02:55 PM2022-06-18T14:55:39+5:302022-06-18T14:58:00+5:30

Medium Spicy Movie Review : मराठीतील आघाडीच्या कलाकारांना एकत्र घेऊन मोहित टाकळकर यांनी हि मीडियम स्पायसी रेसिपी बनवली आहे.

Sai tamhankar lalit prabhakar and paran pethe statter medium spicy movie review | Medium Spicy Movie Review : नातेसंबंधांवरील 'निस्सीम' प्रेमाची रेसिपी 'मीडियम स्पायसी'

Medium Spicy Movie Review : नातेसंबंधांवरील 'निस्सीम' प्रेमाची रेसिपी 'मीडियम स्पायसी'

googlenewsNext

कलाकार : ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, रवींद्र मंकणी, नीना कुलकर्णी, नेहा जोशी, सागर देशमुख, अरुंधती नाग, स्पृहा जोशी, राधिका आपटे, पुष्कराज चिरपुटकर, नचिकेत चिडगोपकर
दिग्दर्शक : मोहित टाकळकर
निर्मात्या : विधी कासलीवाल
शैली : रोमँटीक ड्रामा
कालावधी : २ तास २० मिनिटे
स्टार : तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असतो. कोणी अतिशय शांत तर कोणी भडक माथ्याचं... कोणी चंचल तर कोणी विचारपूर्वक निर्णय घेणारं... या चित्रपटात मीडियम स्पायसी स्वभावाच्या तरुणाची गोष्ट आहे. त्याच्या जीवनात आलेल्या कडू-गोड आठवणींची रेसिपीच जणू यात आहे. लेखनापासून फिल्म मेकींगपर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट आजवर सुरू असलेल्या ट्रेंडपेक्षा वेगळा आहे. थोडा संथ वाटला तरी बऱ्याच ठिकाणी न बोलताही बरंच काही सांगणारा आहे. मराठीतील आघाडीच्या कलाकारांना एकत्र घेऊन मोहित टाकळकर यांनी हि मीडियम स्पायसी रेसिपी बनवली आहे.

कथानक : व्यवसायानं शेफ असलेल्या निस्सीमची ही कथा आहे. एक्स्झीक्युटीव्ह शेफ बनून पॅरीसला जाण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या निस्सीमच्या हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसला काम करणाऱ्या प्राजक्तावर निस्सीम मनोमन प्रेम करत असतो. प्राजक्ताही निस्सीमवर लट्टू असते. दुसरीकडे त्याच्याच हॉटेलच्या कॅन्टिनमध्ये काम करणारी साऊथ इंडियन शेफ के. आर. गोवरी एका वेगळ्याच विश्वात असते. नुकतंच ब्रेकअप झालेल्या गोवरीची निस्सीमसोबत मैत्री होते. प्राजक्ताही निस्सीमच्या जवळ येते, पण त्यानं आपल्या मनातील भावना व्यक्त न केल्यानं ती दुसऱ्याशी लग्न करायला तयार होते. दुसरीकडे गोवरीही निस्सीमपासून दूर जाते. यानंतर निस्सीमच्या आयुष्यात काय घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं.

लेखन-दिग्दर्शन : बरेच ट्विस्ट अ‍ॅड टर्न्स असलेल्या पटकथेमुळं ठराविक अंतरानं उत्कंठावर्धक घटना घडतात. त्यामुळं पुढच्या वळणावर काय पहायला मिळेल याबाबत उत्सुकता लागते. आघाडीचे कलाकार असूनही त्यांच्या दबावाखाली न येता टाकळकर यांनी आपलं काम मुक्तपणे केलं आहे.

एका वेगळ्या विषयावर आधारलेल्या या चित्रपटात आजच्या तरुणाईची जीवनशैली आहे. एक अशी प्रेम कहाणी यात आहे, जी बंधनात राहूनही मनापासून प्रेम करते. वरवर उथळ वाटणारी एखादी व्यक्तीही स्वत:च्या मर्यादा ओळखून वागते, तर शांत वाटणारी एखादी व्यक्ती बेमालूमपणे आपला निर्णय घेऊन मोकळी होते. नातेसंबंधांमधील दुरावा, आपसांतील मतभेद, तत्वांच्या नावाखाली केली जाणारी अडवणूक, अतिकामामुळं येणारं फ्रस्ट्रेशन, नात्यांमधील दुरावा, मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री असे वेगवेगळे पैलू यात आहेत. चित्रपटाची गती काहीशी संथ वाटते. त्यामुळं कथानक पुढे सरकत रहातं, पण घडत मात्र काही नाही. मोठ्या हॅाटेलच्या किचनमधलं टिपिकल वातावरण छान तयार केलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीचं रियुनियन प्रेक्षकांना आपल्या मित्रांची आठवण करून देईल. बोलीभाषेपासून कॅास्च्युमपर्यंत आणि टेकिंगपासून मेकिंगपर्यंत सर्वच गोष्टींवर बारकाईनं काम केल्याचं जाणवतं. लांबलचक दृश्यांना संकलनात कात्री लावून लांबी कमी करण्याची गरज होती. कॅमेरावर्क आणि लोकेशन्स सुंदर आहेत.

अभिनय : हा चित्रपट म्हणजे एखादी रेसिपी मानली गेली तर सई ताम्हणकरनं तिखट मिरचीसारखी भूमिका साकारताना दक्षिणात्य भाषेचा लहेजा अचूक पडकला आहे. त्यासाठी मेहनतही घेतली आहे. मीठासारखं असलेलं कॅरेक्टर ललित प्रभाकरनं नेहमीप्रमाणं सुरेख काम केलं आहे. शेफसाठी आवश्यक सर्व गुण आत्मसात करून हे कॅरेक्टर साकारल्यासारखं वाटतं. दोघांच्या तुलनेत पर्ण पेठेची छाोटी भूमिका तोंडाला पाणी आणणाऱ्या गुलाबजामसारखी आहे. कडू कारल्यासारखी तत्त्वांना चिकटून राहणारी आई नीना कुलकर्णींच्या रूपात, तर तुटत असलेलं नातंही साखरेच्या गोडीनं सांधणारा पिता रवींद्र मंकणींच्या रूपात दिसतो. पत्नी सोडून गेल्यानं फ्रस्ट्रेट झालेल्या पापडासारख्या मित्राची भूमिका सागर देशमुखनं लीलया साकारली आहे. स्पृहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर यांनीही आपल्या कोशिंबिरीसारख्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत स्पृहा जोशी आणि राधिका आपटेंनी लोणच्यासारखी भूमिका साकारली आहे.

सकारात्मक बाजू : नात्यांतील भावबंध अतिशय अलवारपणे सादर करण्यात आले आहेत. कुठेही मर्यादा न ओलांडता प्रेम करणारी तसंच मैत्रीला जागणारी तरुणाई यात आहे.

नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती काहीशी संथ असल्यानं कित्येकदा पुढे काही घडणार आहे की नाही असा विचार मनात येतो.

थोडक्यात : वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या व्यक्तिरेखांना एकत्र आणून नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आलेला प्रयत्न आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयासाठी एकदा हा चित्रपट पहायला हवा.
 

Web Title: Sai tamhankar lalit prabhakar and paran pethe statter medium spicy movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.