"काय गं, किती छान...", सईची लावणी पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया
By कोमल खांबे | Updated: April 18, 2025 14:11 IST2025-04-18T14:10:44+5:302025-04-18T14:11:45+5:30
सईची लावणी पाहून तिची आईदेखील आश्चर्यचकित झाली. सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लावणी पाहून आईची काय प्रतिक्रिया होती, हे सांगितलं.

"काय गं, किती छान...", सईची लावणी पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या आईची अशी होती प्रतिक्रिया
मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड गाजवणारी सई ताम्हणकर एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सई पहिल्यांदाच सिनेमात लावणी करताना दिसणार आहे. देवमाणूस सिनेमातील आलेच मी ही सईची लावणी नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. सईची ठसकेबाज लावणी पाहून चाहते थक्क झाले आहेत. अनेक सेलिब्रिटीही सईच्या या लावणीवर व्हिडिओ बनवत आहेत.
सईची लावणी पाहून तिची आईदेखील आश्चर्यचकित झाली. सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लावणी पाहून आईची काय प्रतिक्रिया होती, हे सांगितलं. "आई सध्या सुखावली आहे. आणि तिला सध्या बरं वाटतंय. जेव्हा आपण आपल्या पालकांच्या डोळ्यात समाधान बघतो तेव्हा जसं छान वाटतं तसं मला आता वाटतंय. प्रत्येक आईच्या नजरेत आपलं मूल शाहरुख खान असतं. तसंच माझ्या आईसाठी मी शाहरुख खान आहे. लावणी पाहिल्यावर आई म्हणाली की काय गं किती छान...तू काहीही करू शकतेस. मला माहितीये...हे तिचं म्हणणं खूप कमी वेळेला मला ऐकायला मिळतं. आणि लावणीनंतर ते ऐकायला मिळालं", असं सई नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
सई पहिल्यांदाच लावणी करत आहे. 'देवमाणूस' या सिनेमात ती लावणीवर थिरकताना दिसणार आहे. हा सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 'देवमाणूस'सोबतच सईचा 'गुलकंद' सिनेमाही १ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर 'ग्राऊंड झिरो' या हिंदी सिनेमात सई झळकणार आहे. हा सिनेमादेखील २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.