सई ताम्हणकरच्या आयुष्यातील देवमाणूस कोण? म्हणाली "ते खूप साधे, त्यांच्यातल्या चांगुलपणामुळे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:02 IST2025-04-20T12:00:49+5:302025-04-20T12:02:20+5:30
सईनं तिच्या आयुष्यातील 'देवमाणूस' म्हणून मराठीतील लोकप्रिय अभिनेत्याचं नावं घेतलं.

सई ताम्हणकरच्या आयुष्यातील देवमाणूस कोण? म्हणाली "ते खूप साधे, त्यांच्यातल्या चांगुलपणामुळे"
सई ताम्हणकर (Saie Tamhankar) हिने कलाविश्वात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान निर्माण केले आहे. आजवर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सईच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी सई गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आली आहे आणि या चर्चांचं कारण म्हणजे 'लावणी'. 'देवमाणूस' या (devmanus movie) बहुप्रतिक्षित चित्रपटात 'आलेच मी' म्हणत पहिल्यांदाच सई शानदार लावणीवर थिरकली आहे. 'देवमाणूस' सिनेमातील ही लावणी नुकतीच रिलीज झाली आहे. 'देवमाणूस' हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यानिमित्तानं सईनं एका मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील 'देवमाणूस' कोण हे सांगितलं आहे.
नुकतंच 'अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सईनं तिच्या आयुष्यातील 'देवमाणूस' म्हणून मराठीतील लोकप्रिय अभिनेत्याचं नावं घेतलं. या मुलाखतीदरम्यान सईला तिच्या आयुष्यातील देवमाणूस कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सई म्हणाली, "खरंतर एक लोकप्रिय आणि छान अभिनेते आहेत, त्यांचं टोपणनाव मी 'देवमाणूस' असं ठेवलं आहे. ते म्हणजे भरत जाधव. भरतदादाला मी देवमाणसा वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा देवमाणसा नवीन वर्षाच्या शुभेच्छा असेच मॅसेज करते. त्यामूळे मला देवमाणूस हे नाव वाचल्यानंतर त्यांचीच आठवण आली".
भरत जाधव यांना सई 'देवमाणूस' का म्हणते, याबद्दलही तिनं सांगितलं. सई म्हणाली, "ते खूप साधे माणूस आहेत. खूप चांगले माणूस आहेत. त्यांच्यातल्या चांगुलपणा भरलेला आहे. त्या चांगुलपणामुळे मला त्यांना देवमाणूस म्हणावंसं वाटतं. आम्ही खूप वर्षांपुर्वी एक चित्रपट केला होता, ज्यावेळी मला त्यांच्या अनुभव आला होता. त्यामुळे तेव्हापासून ते माझ्यासाठी देवमाणूस आहे". दरम्यान, 'देवमाणूस' या सिनेमात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सई या वर्षात कायम वेगवेगळ्या भूमिका तर साकारत असून तिच्या प्रोजेक्ट्सचे विषय देखील तितकेच खास आहेत. सई मराठीत तर काम करतच आहे. पण, बॉलिवूडमध्येही तिनं आपलं नाव गाजवलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स'च्या दमदार यशानंतर सई बहुचर्चित 'डब्बा कार्टेल' वेबसीरिज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली. यानंतर सई लवकरच अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'ग्राऊंड झिरो'मध्ये झळकणार आहे. तर 'ग्राऊंड झिरो'नंतर सई 'मटका किंग'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.