नागराज मंजुळे यांच्या गावातील घराचे फोटो तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:17 PM2018-11-19T16:17:48+5:302018-11-19T16:28:30+5:30
नागराज हे मुळचे सोलापूरमधील असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात ते लहानाचे मोठे झाले आहेत.
नागराज मुंजुळे यांची पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांनी फँड्री, सैराट सारखे एकाहून एक सरस चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. सैराट या चित्रपटाने तर आजवरचे मराठी चित्रपटांचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सैराट या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची गाणी, लोकेशन्स सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड भावले. सध्या नागराज मंजुळे यांचा नाळ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची त्यांनी निर्मिती करण्यासोबतच चित्रपटात काम देखील केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यंकट्टीने केले असून या चित्रपटात एक वेगळाच नागराज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
नागराज गेल्या कित्येक महिन्यांपासून झुंड या हिंदी चित्रपटावर काम करत असून बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नागराज यांनी आज केवळ मराठी इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत देखील चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेक कलाकारांची इच्छा आहे. नागराजने आज इतके यश मिळवले असले तरी त्यांचे पाय आजही जमिनीवर आहेत.
नागराज हे मुळचे सोलापूरमधील असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात ते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या आई-वडिलांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. त्यामुळे त्यांचे वडील पोपटराव यांच्याकडून त्यांचा भाऊ बाबूराव यांनी नागराजला दत्तक घेतले. नागराज यांना लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड होती. त्यासाठी ते अनेकवेळा शाळेला देखील दांडी मारत असत. नागराज यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज त्यांचे प्रस्थ निर्माण केले आहे.
नागराज यांच्या जेऊर या गावात त्यांच्या वडिलांनी बांधलेले एक घर असून नागराज आजही गावी गेल्यानंतर त्याच घरात राहातात. नागराज यांचे हे घर पूर्वी खूपच साधे होते. पण सैराटच्या यशानंतर या घराला रंग देऊन त्याची डागडुजी नागराज यांनी केली आहे.