सैराटच्या यशामुळे रिंकू राजगुरू आजही मिस करते ही गोष्ट, या गोष्टीचे वाटते तिला वाईट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 01:42 PM2020-06-03T13:42:50+5:302020-06-03T13:46:22+5:30
रिंकू राजगुरूनेच ही गोष्ट तिच्या एका मुलाखतीत सांगितली होती. ही गोष्ट पुन्हा कधी करता येईल याची ती आतुरतेने वाट पाहात आहे.
'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरू हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू स्टार बनली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिची हंड्रेड नावाची वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
रिंकू राजगुरूचा सैराट हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही वर्षं उलटून गेली असली तरी रिंकूच्या लोकप्रियतेत थोडा देखील फरक पडलेला नाही. तिची एक तरी झलक पाहायला मिळावी असे तिच्या फॅन्सना वाटत असते. रिंकू ही मुळची अकलूजची असली तरी ती सध्या कामानिमित्त पुण्यात राहाते. पण अकलूजमध्ये आल्यावर रिंकूला संपूर्ण दिवस घरातच काढावा लागतो. रिंकूला फिरायला, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला खूप आवडते. पण सैराट या चित्रपटानंतर एका सामान्य मुलीसारखे तिला आयुष्य जगता येत नाही. तिला फिरायचे असेल तर चेहऱ्यावर स्कार्फ बांधावा लागतो. त्यातही तिच्या घरात गाड्या किती आहेत आणि त्यांचा नंबर काय आहे हे लोकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे स्कार्फ बांधण्याचा देखील काहीही फायदा होत नाही. लोक तिचा पाठलाग करतात. यामुळे तिला खूपच त्रास सहन करावा लागतो. रिंकू अकलूजमध्ये आली आहे हे कोणाला कळू नये यासाठी चांगलीच खबरदारी घेतली जाते. तिच्या कॉलनीतील लोक खूपच चांगले आहेत. ती अकलूजमध्ये आली आहे हे कोणाला कळू नये यासाठी ते देखील तिला मदत करतात.
रिंकू सातवीत असताना तिने सैराट सिनेमासाठी ऑडिशन दिले. वर्षभरानंतर तिची या चित्रपटासाठी निवड झाली. नववीत असताना तिने सैराटच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यामुळे ती वर्षभर शाळेत गेलीच नाही. सैराट चित्रपटानंतर तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली.